
सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । हतनूर धरणातून पुढील गावांसाठी पाणी सोडण्यात आल्यामुळे सावदा शहराच्या पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला असून शहरातील पाणीपुरवठा तात्पुरता विस्कळीत झाला आहे. उपसा विहिरीजवळील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून काही भागांमध्ये पाण्याचा पुरवठा खंडित झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या प्रशासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेत दुरुस्ती आणि स्वच्छता कामांना सुरुवात केली आहे.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत नगराध्यक्षा रेणुका पाटील उपनगराध्यक्ष व पाणीपुरवठा सभापती फिरोजखान पठाण, नगरसेवक सचिन बऱ्हाटे, नगरसेवक नकुल बेंडाळे, जे. के. भारंबे, मुख्याधिकारी भूषण वर्मा तसेच पाणीपुरवठा अभियंता प्रियंका जैन यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह मंगळवाडी येथील जॅकवेल परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली.
पाहणीदरम्यान जॅकवेलजवळील पाइपलाइनमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याचे निदर्शनास आले. या गाळामुळे पाणीपुरवठा यंत्रणेवर ताण निर्माण झाला असून शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तातडीने गाळ काढण्याचे आणि पाइपलाइन स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले असून संबंधित यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
यावेळी कर्मचारी अवि पाटील, पला चौधरी, राहुल यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते. नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी आवश्यक दुरुस्ती आणि स्वच्छता कामे सुरू असून पुढील दोन ते तीन दिवस शहरातील पाणीपुरवठा पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी वेळ लागू शकतो.
दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना संयम राखण्याचे आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. अनावश्यक पाण्याचा वापर टाळून नगरपालिकेस सहकार्य करावे, असेही सांगण्यात आले आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणा समन्वयाने काम करत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.



