
यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या विविध प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे तसेच शासन निर्णय अभियान प्रभावीपणे राबविण्यात यावे, या मागणीसाठी प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या वतीने यावल तहसील कार्यालयावर निवेदन देण्यात आले. या आंदोलनात्मक उपक्रमात तालुक्यातील मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव आणि महिला सहभागी झाल्याने प्रशासनाचे लक्ष वेधले गेले.

प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचे यावल तालुका अध्यक्ष हरिभाऊ पाटील आणि उपाध्यक्ष प्रतिक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. दिव्यांग नागरिकांच्या विविध प्रलंबित मागण्या, शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्यात येणाऱ्या अडचणी तसेच शासकीय निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी उपस्थित दिव्यांग बांधवांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्यक्ष गरजूंपर्यंत पोहोचत नसल्याची खंत व्यक्त केली. दिव्यांगांसाठी जाहीर करण्यात आलेल्या योजना आणि सवलतींची माहिती ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष अभियान राबविण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच प्रशासकीय कार्यालयांमध्ये दिव्यांगांना सुलभ सेवा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली.
मोर्चादरम्यान अनेक महिला दिव्यांगांनीही आपल्या समस्या प्रशासनासमोर मांडल्या. निवृत्ती वेतन, प्रमाणपत्रे, वैद्यकीय सुविधा आणि शासकीय योजनांमधील लाभ मिळविताना येणाऱ्या अडचणींबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रशासनाने दिव्यांगांच्या समस्यांकडे संवेदनशीलतेने पाहून तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिव्यांगांच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज उठविण्याचा निर्धार व्यक्त केला. शासनाने दिव्यांग कल्याणाशी संबंधित निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी केल्यास अनेक गरजू नागरिकांना दिलासा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.



