Home Cities जळगाव अवैध सट्टा बाजारावर मनसेचा हल्लाबोल; १० दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा...

अवैध सट्टा बाजारावर मनसेचा हल्लाबोल; १० दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील विविध भागांमध्ये खुलेआम सुरू असलेल्या अवैध सट्टा बाजाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली असून येत्या १० दिवसांत हे अवैध धंदे पूर्णपणे बंद करण्यात यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनसेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना देण्यात आला आहे. शहरातील वाढत्या अवैध धंद्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून तरुण पिढी व्यसन आणि गुन्हेगारीकडे वळत असल्याचा गंभीर आरोप मनसेने केला आहे.

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात शहरातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत उघडपणे सुरू असलेल्या सट्टा बाजारांचा उल्लेख केला आहे. जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट परिसरात शासकीय कार्यालयाच्या खालीच बिनधास्तपणे सट्टा सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील गुजरात पेट्रोल पंप उड्डाणपुलाजवळ बळकावलेल्या जागेवर आणि कोल्हे हिल्स परिसरातील सिद्धिविनायक चौकात ‘ग्रीन शेड’ उभारून बेकायदेशीर सट्टा चालवला जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत रामानंद घाट नाल्याजवळ मोठ्या प्रमाणावर सट्टा बाजार सुरू असल्याचा आरोप मनसेने केला आहे. या सर्व ठिकाणी खुलेआम अवैध व्यवहार सुरू असताना स्थानिक पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

मनसेने निवेदनात स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “हे सर्व अवैध धंदे शासकीय कार्यालये आणि पोलीस यंत्रणेच्या नाकाखाली सुरू असताना संबंधित पोलीस निरीक्षक कारवाई का करत नाहीत?” असा थेट सवाल मनसेने उपस्थित केला आहे. पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढले असून शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

मनसेने प्रशासनाला १० दिवसांचा अल्टिमेटम देत स्पष्ट इशारा दिला आहे की, या कालावधीत शहरातील अवैध सट्टा बाजार आणि संबंधित धंद्यांवर कठोर कारवाई करून ते पूर्णपणे बंद करण्यात यावेत. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्रस्त नागरिकांना सोबत घेऊन जळगाव शहरात तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारेल. आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

हे निवेदन देताना मनसे उपमहानगर अध्यक्ष राजेंद्र एस. निकम, श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, प्रकाश जोशी, अनिता कापुरे, लक्ष्मी मोरे, विकास पाथरे, राजेश मराठे, इसुभ खाटीक, अजमल खाटीक, अली खाटीक आणि बादशहा खाटीक यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound