Home Cities जळगाव जळगावात ‘सतपंथ शिष्यवृत्ती महाअभियान’ प्रकल्पाचा २३ रोजी उद्घाटन सोहळा

जळगावात ‘सतपंथ शिष्यवृत्ती महाअभियान’ प्रकल्पाचा २३ रोजी उद्घाटन सोहळा


फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगावातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध करून देणाऱ्या ‘सतपंथ शिष्यवृत्ती महाअभियान’ प्रकल्पाचा प्रेरणादायी उद्घाटन सोहळा शनिवारी, २३ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट, फैजपूर आणि नोबेल फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत असून, विद्यार्थ्यांना एमपीएससी, यूपीएससी, नीट आणि जेईईसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी मोफत मार्गदर्शन, निवास आणि भोजन व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण आणि गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व स्पर्धा परीक्षांसाठी नवे व्यासपीठ मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

या प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभासाठी परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून ते कार्यक्रमाचे उद्घाटक आणि अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. समाजातील वंचित घटकांपर्यंत शिक्षणाची संधी पोहोचविण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

कार्यक्रमाला राज्यातील विविध मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री संजय सावकारे तसेच जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या उपक्रमामुळे जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मोठ्या शहरांमध्ये जाऊन महागडे प्रशिक्षण घेण्याची गरज कमी होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

कार्यक्रमात आमदार राजूमामा भोळे, आमदार अमोल जावळे, महापौर दीपमाला काळे तसेच उपमहापौर मनोज चौधरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याशिवाय प्रेरणादायी उपस्थिती म्हणून जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी उपस्थित राहणार आहेत.

शिकवणी ग्राऊंड, गुरुकृपा क्लासेससमोर सायंकाळी ६ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजकांच्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निवासी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासोबतच गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या प्रकल्पातून केला जाणार आहे. समाजातील दानशूर संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम आकाराला आल्याचेही सांगण्यात आले.

सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट आणि नोबेल फाउंडेशनच्या या संयुक्त उपक्रमामुळे जळगाव जिल्ह्यातील अनेक गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी नवे बळ मिळणार आहे. आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रकल्प आशेचा किरण ठरणार असल्याची भावना नागरिक आणि शिक्षण क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound