Home उद्योग बळवंत नागरी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘सहकार परिषद’ उत्साहात 

बळवंत नागरी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘सहकार परिषद’ उत्साहात 


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सहकार भारती जळगाव जिल्हा आणि बळवंत नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेली ‘सहकार परिषद’ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे पार पडलेल्या या परिषदेत सहकार क्षेत्रातील सध्याची परिस्थिती, पतसंस्थांसमोरील आव्हाने, कायदेशीर अडचणी तसेच भविष्यातील दिशा यावर सखोल चर्चा करण्यात आली. सहकार क्षेत्रातील मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीमुळे परिषदेला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

या परिषदेच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्ह्याचे सहकार उपनिबंधक गौतम बलसाने हे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी सहकार चळवळीचे सामाजिक महत्त्व अधोरेखित करताना पतसंस्थांनी पारदर्शकता आणि विश्वासार्हता जपणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक उन्नतीत सहकारी संस्थांची भूमिका महत्त्वाची असून, बदलत्या काळानुसार सहकार क्षेत्राने आधुनिक तंत्रज्ञान आणि सुशासन स्वीकारले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. बळवंत नागरी सहकारी पतसंस्थेच्या २५ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचे त्यांनी विशेष कौतुक केले.

परिषदेला सहकार क्षेत्रातील अनेक दिग्गजांची उपस्थिती लाभली. जळगाव जिल्हा सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रहास भाई गुजराथी, महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनचे उपाध्यक्ष रोहित निकम, सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशचे महामंत्री तथा सहकार धोरण समिती सदस्य विवेक जुगादे, जळगाव जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष शशिकांत साळुंखे, जेडीसीसी बँकेचे अध्यक्ष संजय पवार, सहकार भारती सहकार प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष संजय बिर्ला, जळगाव जनता सहकारी बँक लिमिटेडचे अध्यक्ष सतीश मदाने तसेच सहकार नेते प्रदीप देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी सहकार क्षेत्रातील विविध प्रश्नांवर आपले विचार मांडले.

परिषदेदरम्यान सहकारी पतसंस्थांच्या कामकाजात येणाऱ्या कायदेशीर अडचणी, आर्थिक व्यवस्थापन, सभासदांचा विश्वास टिकविणे, डिजिटायझेशनची गरज आणि ग्रामीण भागातील आर्थिक सक्षमीकरण या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. सहकार क्षेत्र अधिक सक्षम आणि जनाभिमुख करण्यासाठी विविध उपाययोजनांवर उपस्थितांनी मार्गदर्शन केले. बदलत्या आर्थिक व्यवस्थेत सहकारी संस्थांनी स्पर्धात्मक राहण्यासाठी नव्या धोरणांची आवश्यकता असल्याचे मत अनेक वक्त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण आणि प्रभावी सूत्रसंचालन प्रमोद माळी यांनी केले. परिषद यशस्वी पार पडण्यासाठी आयोजकांनी केलेल्या नियोजनाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवर, प्रतिनिधी आणि नागरिकांचे आभार मानण्यात आले. या परिषदेला जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते, विविध पतसंस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound