नागपूर-वृत्तसेवा । प्रसिद्ध अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत केलेल्या परखड आणि भावनिक भाषणाने उपस्थितांना विचार करायला भाग पाडले. शेतकरी, समाजातील जातीयता, सामाजिक बांधिलकी आणि सामूहिक कामाची गरज यावर बोलताना नाना पाटेकर यांनी “आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय” असे वक्तव्य करत आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. त्यांच्या भाषणातील अनेक मुद्दे उपस्थितांच्या मनाला भिडले.
नाना पाटेकर यांनी समाजासाठी सामूहिकपणे काम करण्याची गरज अधोरेखित करताना, “सामूहिक पद्धतीने केलेलं काम हे एकट्याने केलेल्या कामापेक्षा खूप मोठं असतं,” असे सांगितले. आपल्या राज्यात अनेक संस्था कार्यरत असल्या तरी त्या सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. “आपण कोणताही राजकीय पक्ष नाही, सरकार काय करायचं ते ठरवेल; पण समाजासाठी काम करत राहणं गरजेचं आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना नाना पाटेकर भावुक झाले. “मी शहरात राहू शकत नाही. मला माझं शेत, गायी आणि कुत्री प्रिय आहेत. शहरातील भिंती आता कबरीसारख्या वाटू लागतात,” असे म्हणत त्यांनी ग्रामीण जीवनाशी असलेले नाते व्यक्त केले. कोरडवाहू शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेत आपण नाम फाउंडेशनच्या माध्यमातून मदतकार्य सुरू केल्याचे सांगत त्यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी केलेल्या आर्थिक मदतीचाही उल्लेख केला. “माणूस म्हणून आपले काही कर्तव्य आहे हे समजून मी दीड कोटी रुपये दिले आणि प्रत्येक शेतकऱ्याला १५ हजार रुपये मदत देण्यास सांगितले,” असे त्यांनी सांगितले. नाम फाउंडेशन स्थापन झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत लोकांनी तब्बल ६० कोटी रुपयांची मदत दिली होती, अशी माहितीही त्यांनी दिली.
जातीयतेच्या मुद्द्यावर बोलताना नाना पाटेकर यांनी अत्यंत संवेदनशील भूमिका मांडली. “मुसलमान आणि हिंदू यांच्यात काय फरक असतो, असा प्रश्न मी लहानपणी आईला विचारायचो. त्यावर ती म्हणायची, हिंदू हात जोडून प्रार्थना करतो आणि मुस्लिम हात उघडे करून,” असे सांगत त्यांनी मानवतेलाच सर्वोच्च धर्म मानण्याचा संदेश दिला. “जाती कधीच संपणार नाहीत; पण शिक्षण आणि ज्ञानाच्या माध्यमातून त्यातील दरी नक्की कमी करता येईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
राजकीय मतभेदांवर भाष्य करताना त्यांनी, “भाजप असो किंवा काँग्रेस, विचाराने आपण सगळे एकच आहोत,” असे सांगितले. समाजातील चळवळी केवळ भाषणापुरत्या न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरल्या पाहिजेत, असेही त्यांनी नमूद केले. “चार मंडळींपलीकडे आपण विचार करत नाही, हीच मोठी समस्या आहे,” असे सांगत त्यांनी समाजमनाला आरसा दाखवला.
अभिनय क्षेत्रातील अनुभव सांगताना त्यांनी दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांचाही उल्लेख केला. “विक्रम गोखले माझ्यापेक्षा उत्तम नट राहणार आहेत, मरेपर्यंत,” असे म्हणत त्यांनी त्यांच्या अभिनयकौशल्याचे कौतुक केले.



