चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव ते नांदगाव रस्त्यावरील खडकी गावाजवळ असलेल्या विजय ढाब्यासमोर एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. एका अज्ञात मोटरसायकल चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून समोरून येणाऱ्या पल्सर मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुण सागर भगवान निकुंभ (वय २८, रा. हिरापूर, ता. चाळीसगाव) याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात १५ मे रोजी रात्री ८:१५ वाजेच्या सुमारास घडला. फिर्यादी समाधान भगवान पवार (वय ३५, रा. खडकी बु॥) यांनी याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सागर निकुंभ हा आपल्या पल्सर मोटरसायकलने (एमएच १९ सीटी ७७८१) जात असताना, समोरून येणाऱ्या अज्ञात स्प्लेंडर चालकाने (क्र. एमएच १९ बीवाय ८६३५) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून त्याला समोरून जोराची धडक दिली.

या धडकेमुळे सागर मोटरसायकलवरून खाली कोसळला आणि त्याच्या डोक्याला अत्यंत गंभीर दुखापत झाली. ही दुखापत सागरच्या मृत्यूस कारणीभूत ठरली. संतापजनक बाब म्हणजे, अपघात घडल्यानंतर अज्ञात स्प्लेंडर चालकाने जखमी सागरला कोणतीही वैद्यकीय मदत न करता किंवा पोलिसांना अपघाताची माहिती न देता घटनास्थळावरून पळ काढला. याबाबत चाळीसगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.



