जळगाव-जितेंद्र कोतवाल । प्रेमप्रकरणातून घर सोडून गेलेल्या १९ वर्षीय तरुणाने जळगाव रेल्वे स्थानकाजवळ धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना आज, शुक्रवार १५ मे रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. गणेश कोळी असे मृत तरुणाचे नाव आहे. विशेष म्हणजे, आत्महत्या करण्यापूर्वी आणि मृत्यूनंतर पोलीस येईपर्यंत या तरुणाचा आईसोबतचा कॉल सुरू होता, ज्यामुळे सर्व थरार मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाला आहे. याबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. यावेळी रूग्णालयात नातेवाईकांनी हंबरडा फोडला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश कोळी याचे गावातीलच एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. हे दोघेही ४ मे पासून घरातून निघून गेले होते. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती. आज शुक्रवारी १५ मे रोजी सकाळी जळगाव रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर दोघांनीही आपल्या नातेवाईकांना फोन करून आपण जळगावला आल्याची माहिती दिली. त्यानंतर तरुणीचा भाऊ जळगाव रेल्वेस्थानकावर येवून तिला घेऊन गेला.

आईशी शेवटचा संवाद आणि मृत्यू :
तरुणीला तिचे नातेवाईक घेऊन गेल्यानंतर गणेशने आपल्या आईला शेवटचा फोन केला. इंस्टाग्रामवर तरुणीसोबतचा फोटो शेअर करून त्याने “माय वाईफ माय जान” असे स्टेटस ठेवले होते. आईशी बोलताना तो म्हणाला, “आई, मी मोठी चूक केली आहे. हा माझा तुला शेवटचा कॉल आहे.” एवढे बोलून त्याने छत्रपती शिवाजी नगर रेल्वे उड्डाणपुलाजवळ धावत्या रेल्वेखाली उडी घेतली. धक्कादायक बाब म्हणजे, उडी घेतल्यानंतरही त्याचा फोन सुरूच होता. रेल्वे पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले, तेव्हा त्यांनी मोबाईल उचलला असता पलीकडून त्याची आई बोलत असल्याचे समोर आले.
नातेवाईकांचा गंभीर आरोप :
या घटनेनंतर गणेशच्या नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुलीच्या नातेवाईकांनी दबाव टाकून शिवीगाळ करत कुटुंबाला संपविण्याची धमकी दिली असल्याचे सांगून त्यांनी त्याला गणेशला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. यासंदर्भात नातेवाईकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची भेट घेतली. जोपर्यंत संशयित आरोपींवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा कुटुंबाने दिला आहे.
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून, विभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी या संदर्भात संपूर्ण चौकशी केली जाईल, अशी ग्वाही दिली आहे. या प्रकरणातील कॉल रेकॉर्डिंग हा महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



