जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील उमाळा-नशिराबाद रोड परिसरातील औद्योगिक वसाहतीत गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने होत असलेल्या वीज खंडित (ट्रिपिंग) प्रक्रियेमुळे उद्योजक हवालदिल झाले आहेत. वारंवार होणाऱ्या वीज पुरवठा खंडित होण्यामुळे कंपन्यांचे कोट्यवधींचे आर्थिक नुकसान होत असून, या त्रासाला कंटाळून ‘जळगाव ग्रामीण इंडस्ट्रियल असोसिएशन’ने आता थेट महावितरणकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
जळगाव ग्रामीण इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष सचिन लड्डा लढ्ढा यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना हे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात उद्योजकांनी त्यांच्या व्यथा मांडल्या आहेत. उमाळा नशिराबाद रोडवर असलेल्या विविध कंपन्यांना दररोज वीज ट्रिपिंगचा सामना करावा लागत आहे. यामुळे एमआयडीसीच्या तुलनेत इथल्या कंपन्यांना प्रति युनिट उत्पादन खर्च ३ रुपयांनी जास्त लागत आहे, ज्यामुळे या कंपन्या स्पर्धेत टिकणे कठीण झाले आहे.

वारंवार वीज जात असल्यामुळे उत्पादनात मोठी घट होत असून, कामगारांचे पगार देणेही मालकांना कठीण झाले आहे. प्रोसेसिंग युनिटमधील हीटिंग डिस्टर्ब झाल्यामुळे वीज बिल अधिक येते आणि वीज खंडित झाल्यामुळे लाखो रुपयांचा कच्चा माल खराब होऊन भंगारात विकावा लागतो, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. या आर्थिक तोट्यामुळे उद्योजकांना बँकांचे हप्ते आणि व्याज भरणे देखील अशक्य झाले आहे.
उद्योजकांनी आक्रमक पवित्रा घेत महावितरणला विनंती केली आहे की, गेल्या आठ वर्षांपासून झालेल्या सर्व नुकसानीची भरपाई आम्हाला मिळावी. जर महावितरणला सुरळीत वीज पुरवठा करणे शक्य नसेल, तर आमच्या जागा आणि मशनरींची किंमत लावून हे सर्व कारखाने आपणच विकत घ्यावेत आणि आम्हाला या नुकसानीच्या कचाट्यातून मुक्त करावे, अशी टोकदार मागणी असोसिएशनने केली आहे.



