Home आरोग्य मुदतपूर्व जन्मलेल्या शिशूचे प्राण वाचवण्यात डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील एनआयसीयू विभागाला यश

मुदतपूर्व जन्मलेल्या शिशूचे प्राण वाचवण्यात डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील एनआयसीयू विभागाला यश


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुदतपूर्व प्रसूतीमुळे जन्मलेल्या अत्यंत कमी वजनाच्या नवजात शिशूचे प्राण वाचवण्यात जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञांना मोठे यश मिळाले आहे. एनआयसीयू विभागातील अत्याधुनिक उपचारपद्धती, तज्ज्ञ डॉक्टरांची तत्परता आणि नर्सिंग स्टाफच्या सातत्यपूर्ण देखरेखीमुळे या शिशूची प्रकृती सुधारली असून त्याला सुरक्षितपणे घरी सोडण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रावेर येथील किशोर इंगळे यांच्या पत्नीला अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्याने मुदतपूर्व प्रसूती करण्यात आली. जन्मलेले शिशू अत्यंत कमी वजनाचे होते. त्याला श्वसनास त्रास, तीव्र अशक्तपणा तसेच शरीरातील आवश्यक कार्ये व्यवस्थित न होणे अशा गंभीर समस्या जाणवत होत्या. त्यामुळे कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

शिशूची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला तातडीने डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील अत्याधुनिक एनआयसीयू (नवजात अतिदक्षता विभाग) मध्ये दाखल करण्यात आले. नवजात शिशू तज्ज्ञ डॉ. सुयोग तन्नीरवार यांनी शिशूची सखोल तपासणी करून विशेष निगराणीखाली उपचार सुरू केले. शिशूचे वजन अत्यल्प असल्याने त्याच्या आरोग्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले.

उपचारादरम्यान शिशूचे शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणे, श्वसनासाठी आवश्यक मदत उपलब्ध करून देणे, संसर्गापासून संरक्षण करणे तसेच योग्य प्रमाणात पोषण देणे यावर विशेष भर देण्यात आला. डॉक्टर आणि परिचारिका यांच्या सततच्या देखरेखीमुळे शिशूमध्ये हळूहळू सकारात्मक बदल दिसून येऊ लागले.

उपचाराच्या पहिल्याच आठवड्यात शिशूच्या वजनात वाढ होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर नियमित उपचार, योग्य पोषण व्यवस्थापन आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे महिनाभरात शिशूची प्रकृती लक्षणीयरीत्या सुधारली. सध्या शिशू पूर्णपणे सुरक्षित असून त्याला घरी सोडण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

या यशस्वी उपचार प्रक्रियेत डॉ. कुशल धांडे, डॉ. ओमश्री गुडे, डॉ. विशाल कोठावदे, डॉ. अस्मिता गायकवाड, डॉ. सृष्टी भिरूड आणि भारती झोपे यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले.

याबाबत बोलताना डॉ. ओमश्री गुडे यांनी सांगितले की, “मुदतपूर्व जन्मलेल्या आणि कमी वजनाच्या शिशूंमध्ये अनेक गुंतागुंती निर्माण होण्याची शक्यता असते. अशा वेळी तातडीने आणि योग्य उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. या शिशूवर एनआयसीयूमध्ये अत्याधुनिक पद्धतीने उपचार करण्यात आले. डॉक्टर, नर्सिंग स्टाफ आणि पालकांच्या सहकार्यामुळे शिशूची प्रकृती सुधारण्यास मोठी मदत झाली.”

या यशस्वी उपचारामुळे डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील एनआयसीयू विभागाच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा कौतुक होत असून, गंभीर अवस्थेतील नवजात शिशूंनाही येथे प्रभावी उपचार मिळत असल्याचा विश्वास पालकांमध्ये निर्माण झाला आहे.


Protected Content

Play sound