मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यभरात “पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसीज (पीसीओडी) क्लिनिक” सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांमध्ये झपाट्याने वाढत असलेल्या पीसीओडी समस्येवर वेळेत निदान, उपचार आणि समुपदेशन उपलब्ध व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
राज्य कुटुंब कल्याण कार्यालय, पुणे यांनी यासंदर्भात सर्व जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना आदेश जारी केले आहेत. या निर्णयामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार आणि मार्गदर्शन एकाच ठिकाणी मिळणार आहे.

पीसीओडी ही महिलांमध्ये आढळणारी गंभीर हार्मोनल समस्या मानली जाते. या आजारामुळे मासिक पाळी अनियमित होणे, वजन वाढणे, वंध्यत्व, चेहऱ्यावर केस वाढणे, त्वचेच्या समस्या, मानसिक ताण यांसारख्या अनेक आरोग्यविषयक अडचणी निर्माण होतात. विशेषतः किशोरवयीन मुली आणि प्रजननक्षम वयोगटातील महिलांमध्ये या समस्येचे प्रमाण वाढत असल्याने शासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
शासनाच्या आदेशानुसार ६ मे २०२६ पासून राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालये, सामान्य रुग्णालये, स्त्री रुग्णालये, १०० खाटांची उपजिल्हा रुग्णालये आणि महानगरपालिका रुग्णालयांमध्ये हे क्लिनिक सुरू करण्यात येणार आहे. दर बुधवारी या विशेष ओपीडीचे आयोजन करण्यात येणार असून महिलांना नियमित तपासणी आणि सल्ला दिला जाणार आहे.
या क्लिनिकमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञांकडून तपासणी, आवश्यक वैद्यकीय चाचण्या, समुपदेशन, आहार आणि जीवनशैलीविषयक मार्गदर्शन तसेच एकात्मिक उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ज्या ठिकाणी नियमित स्त्रीरोग तज्ज्ञ उपलब्ध नसतील, तेथे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नियुक्त तज्ज्ञांची सेवा घेतली जाणार आहे.
महिलांमध्ये पीसीओडीबाबत जनजागृती वाढविणे आणि वेळेत उपचार उपलब्ध करून भविष्यातील गंभीर आरोग्य समस्या टाळणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.



