जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात सध्या सूर्याचा कोप पाहायला मिळत असून तापमानाचा पारा ४५ अंशांच्या आसपास पोहोचला आहे. अशा भीषण उष्णतेमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक छोटे विक्रेते रस्त्याच्या कडेला बसून आपली इमानदारीने विक्री करत असतात. या कष्टकऱ्यांचा संघर्ष आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेत जळगाव पोलीस दलाने एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. रणरणत्या उन्हात उभे राहून व्यवसाय करणाऱ्या २० निवडक किरकोळ विक्रेत्यांना जळगाव शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात बोलावून त्यांना मोठ्या छत्र्या आणि गार पाणी साठवण्यासाठी दर्जेदार ‘मिल्टन’ कंपनीच्या वॉटर बॉटलचे वाटप करण्यात आले. कडक उन्हात सावलीचा आधार मिळाल्याने या विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव पाहायला मिळाले.
या उपक्रमासाठी जळगाव पोलीस प्रशासनाने अत्यंत पारदर्शकपणे अशा व्यक्तींची निवड केली होती, जे खरोखरच दिवसभर उन्हात बसून किरकोळ विक्रीचे काम करतात. या विक्रेत्यांना मदत करताना “अरे संसार संसार, कसा नाही गड्या मान?”“एका घासाला कागा, दुसरा सुके उभा प्राण! या बहिणाबाई चौधरी यांच्या ओळींची प्रचिती येत होती. संसाराच्या गाड्यासाठी उन्हाची तमा न बाळगता कष्ट करणाऱ्या या हातांना मदतीचा हात मिळावा, हा यामागचा मुख्य उद्देश होता. यावेळी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी या विक्रेत्यांशी आपुलकीने संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांना उन्हापासून स्वतःचा बचाव करण्याच्या सूचनाही दिल्या.

कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिव रे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, आणि शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी यावेळी भावना व्यक्त करताना सांगितले की, पोलीस दल हे नेहमीच जनतेच्या सेवेसाठी तत्पर असते, अशा सामाजिक उपक्रमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. या मदतीमुळे विक्रेत्यांना भरउन्हात विक्री करणे आता थोडे सुसह्य होणार आहे. पोलिसांच्या या संवेदनशील भूमिकेचे जळगाव शहरात सर्वस्तरातून स्वागत केले जात आहे.



