भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारा केळी परिसंवाद गुढे (ता. भडगाव) येथे उत्साहात पार पडला. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत केळी संशोधन केंद्र, जळगाव आणि केळी शेतकरी-शास्त्रज्ञ मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात आधुनिक तंत्रज्ञान, रोग व्यवस्थापन आणि उत्पादनवाढीच्या उपायांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
ता. भडगाव येथील गुढे गावात संजय मोहन मोरे यांच्या शेतात आयोजित या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून केळी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. अरुण भोसले यांनी केळी पिकासमोरील सध्याची आव्हाने, संशोधनातील नव्या दिशा आणि शेतकऱ्यांसाठी उपलब्ध उपाययोजना याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी शेतकऱ्यांना संशोधन केंद्रावर भेट देऊन प्रत्यक्ष प्रात्यक्षिके पाहण्याचे आवाहनही केले.

या परिसंवादात विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन करताना केळी पिकातील घड व्यवस्थापन, निर्यातक्षम उत्पादन, रोग नियंत्रण तसेच खत व जमीन आरोग्य व्यवस्थापन या महत्त्वाच्या विषयांवर सखोल माहिती दिली. डॉ. किरण जाधव यांनी निर्यातक्षम घड व्यवस्थापनाचे तंत्र स्पष्ट केले, तर डॉ. विजयराज गुजर यांनी रोग नियंत्रणाच्या उपाययोजना मांडल्या. डॉ. नितीन सातपुते यांनी खत व्यवस्थापन आणि जमिनीच्या आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी आंतरराष्ट्रीय जहरमुक्त कृषी तज्ज्ञ राहुल जवान यांनी ‘रसायनमुक्त शेतीद्वारे कर्जमुक्ती’ या विषयावर मार्गदर्शन केले. गणेश बोंडे यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना थेट उत्तरे देत त्यांचे मार्गदर्शन केले, तर भारतीय किसान युनियन अन्नदाता संस्थेचे महेश मीना यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न केंद्र स्तरावर मांडण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाला उपविभागीय कृषी अधिकारी दीपक ठाकूर, विविध तालुक्यांचे कृषी अधिकारी, केळी शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष संदीप पाटील, उपाध्यक्ष विनोद बोरसे तसेच जिल्ह्यातील मोठ्या संख्येने केळी उत्पादक शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संजय मोहन मोरे आणि विनोद बोरसे यांनी विशेष प्रयत्न केले, तर राम बायोटेकचे पुष्कराज चौधरी यांनी सहकार्य केले.
या परिसंवादामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, रोग-कीड नियंत्रण आणि उत्पादनवाढीसाठी उपयुक्त माहिती मिळाली असून, भविष्यातील शेती अधिक सक्षम आणि नफ्याची करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.



