Home Cities भुसावळ ताप्ती पब्लिक स्कूलचा ‘जीव दया जल सेवा’ प्रेरणादायी उपक्रम 

ताप्ती पब्लिक स्कूलचा ‘जीव दया जल सेवा’ प्रेरणादायी उपक्रम 


भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मिडीयम स्कूलने राबविलेला ‘जीव दया जल सेवा’ उपक्रम माणुसकीचा आणि पर्यावरणप्रेमाचा उत्तम संदेश देणारा ठरला आहे. सध्या शहराचा पारा ४५ अंशांच्या पुढे गेल्याने नागरिकांसह मुक्या जीवांनाही तीव्र उष्णतेचा सामना करावा लागत असून, या परिस्थितीत विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतलेला हा उपक्रम विशेष लक्षवेधी ठरत आहे.

या उपक्रमांतर्गत शाळेच्या प्राचार्या नीना कटलर, उपप्राचार्या मनप्रीत कौर अरोडा आणि श्रद्धाली घुले यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व विद्यार्थ्यांनी शाळेच्या गच्चीवर तसेच परिसरातील झाडांवर आणि झाडाखाली मातीची भांडी ठेवून पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था केली आहे. या भांड्यांमध्ये दररोज स्वच्छ पाणी भरले जात असून, पक्ष्यांना पिण्यासोबतच आंघोळीचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. उन्हाच्या कडाक्यात पक्ष्यांना दिलासा देणारे हे छोटे पाणवठे त्यांच्या जगण्यासाठी महत्त्वाचे ठरत आहेत.

या मोहिमेत शाळेतील नववीच्या विद्यार्थ्यांनी विशेष पुढाकार घेतला असून, पर्यावरण मंडळाच्या सदस्यांनी दररोज पाण्याची भांडी स्वच्छ ठेवण्याची आणि पाणी बदलण्याची जबाबदारी स्वखुशीने स्वीकारली आहे. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि निसर्गाबद्दलची जाणीव या उपक्रमातून स्पष्टपणे दिसून येत आहे.

यावेळी प्राचार्या नीना कटलर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, मुक्या प्राण्यांवर आणि पक्ष्यांवर दया करणे हीच खरी मानवता आहे. उन्हाळ्याच्या कठीण काळात प्रत्येकाने निसर्ग संवर्धनासाठी पुढाकार घेतला पाहिजे. त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या घराच्या गॅलरीत, अंगणात किंवा झाडावर किमान एक पाण्याचे भांडे ठेवण्याचे आवाहन केले. या उपक्रमासाठी व्हॉईसप्रिन्सिपल श्रद्धाली घुले, मनप्रीत कौर, मुकेश कोळी, आकाश परदेशी, डॅनियल पवार, महेंद्र सूर्यवंशी, सोनाली मुजुमदार आणि हर्षला पाटील या शिक्षकांचेही मोलाचे सहकार्य लाभले.


Protected Content

Play sound