सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ येथील पेपर मिल परिसरात बंद असलेली बस सेवा पुन्हा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली असून रणगाव ग्रामपंचायतीने यासाठी ठोस पुढाकार घेतल्याने स्थानिकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.
सावदा परिसरातील पेपर मिल भागात गेल्या काही काळापासून बस सेवा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांसह कामगार व सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर रणगावचे सरपंच संदीप कोळी आणि उपसरपंच नितीन पाटील यांनी आज संबंधित बस डेपो मॅनेजर श्री. पठाण यांची प्रत्यक्ष भेट घेतली. या भेटीत त्यांनी लेखी निवेदन सादर करत बस सेवा तातडीने पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली.

या चर्चेदरम्यान ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असलेला परिणाम, तसेच रोजच्या प्रवासासाठी पर्यायी सुविधा नसल्याने नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी यांची सविस्तर माहिती डेपो प्रशासनाला दिली. विशेषतः शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
निवेदनाची दखल घेत डेपो मॅनेजर श्री. पठाण यांनी सकारात्मक भूमिका दर्शवली असून या मागणीवर लवकरच कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. बस सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया गतीने पूर्ण केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.



