पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील वडगाव प्र.भ. खु: (सांगवी शिवार) येथे मंगळवारी दुपारी झालेल्या शॉर्टसर्किटमुळे शेतात भीषण आग लागून उभ्या पिकांसह शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाले. या घटनेत अंदाजे तीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाले असून, आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर आणखी आर्थिक आघात झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सांगवी शिवारातील गट क्रमांक २३/१ व २३/२ मधील शेतात दुपारी १ ते २ वाजेच्या सुमारास विजेच्या खांबावर अचानक शॉर्टसर्किट झाले. या ठिणगीमुळे शेतातील कोरड्या पिकांना आग लागून काही क्षणांतच आगीने विकराळ रूप धारण केले. शेतातील उभे असलेले मका, ज्वारी व चारा यासह ठिबक सिंचन संच आणि पाईप यांना या आगीने वेढले.

घटनेची माहिती स्थानिक शेतकरी विलास पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने शेतमालक राजेंद्र हरसिंग पाटील आणि चंद्रसिंग लालसिंग पाटील यांना कळवले. ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले, मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. सुमारे चार एकर क्षेत्रातील उभे पीक आणि शेतीसाठी वापरण्यात येणारे साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले.
या आगीत सुमारे ५० हजार रुपये किमतीचे शेतीपयोगी साहित्य आणि लाखो रुपयांचे पीक नष्ट झाले असून, एकूण नुकसान तीन ते चार लाखांच्या घरात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे आधीच बाजारभावाच्या अभावामुळे, गारपिटीच्या फटक्यामुळे आणि वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
घटनेची माहिती पोलिस, महावितरण कंपनी आणि कृषी विभागाला देण्यात आली आहे. घटनास्थळी महावितरणचे अभियंता धकाते यांनी भेट देऊन पाहणी केली असून, झालेल्या नुकसानीचा अहवाल वरिष्ठ प्रशासनाकडे पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सांगवी शिवाराचे तलाठी शिरसाठ यांनीही प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामा केला.
दरम्यान, पीडित शेतकरी राजेंद्र हरसिंग पाटील आणि चंद्रसिंग लालसिंग पाटील यांनी प्रशासनाकडे तात्काळ आर्थिक मदतीची मागणी केली आहे. सततच्या नैसर्गिक व आर्थिक संकटांमुळे शेतकरी अडचणीत सापडले असून, अशा आगीच्या घटनांमुळे त्यांचे नुकसान अधिकच वाढत आहे.



