


नशिराबाद, ता. जळगाव-हरीश पाटील । पोळा सणाच्या पूर्वसंध्येला, शेतकऱ्यांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैलाच्या कत्तलीचा धक्कादायक प्रकार नशिराबादमध्ये उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पहाटे चार वाजेच्या सुमारास गोरक्षकांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नशिराबाद पोलिसांनी कुरेशी मोहल्ल्यातील एका घरावर अचानक धाड टाकली.
या कारवाईदरम्यान घरामध्ये कापलेल्या अवस्थेतील बैल आढळून आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी अस्लम कुरेशी आणि अकिल कुरेशी यांना अटक केली असून, आणखी काही संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस कर्मचारी अतुल महाजन, चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.
पोळ्याच्या अवघ्या एक दिवस आधीच बैल कत्तलीचा प्रकार समोर आल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास प्रशांत विरणारे आणि प्रवीण लोहार करीत आहेत.



