जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र पोलीस दलात उत्कृष्ट सेवा, अजोड कर्तव्यदक्षता आणि गुणवत्तापूर्ण कामगिरी करणाऱ्या अधिकारी व अंमलदारांचा सन्मान करण्यासाठी दिला जाणारा मानाचा ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह’ पुरस्कार २०२५ जाहीर झाला आहे. यामध्ये जळगाव जिल्हा पोलीस दलाने उल्लेखनीय यश संपादन केले असून जिल्ह्यातील एकूण २८ पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते यांनी २९ एप्रिल २०२६ रोजी यासंदर्भातील अधिकृत आदेश निर्गमित केले. या यादीत जळगाव जिल्ह्यातील ५ अधिकारी आणि २३ अंमलदारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे गुन्हे शाखा, विशेष शाखा, श्वान पथक आणि बँड पथकातील कर्मचाऱ्यांनीही आपल्या कामाचा ठसा उमटवत या पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे.

पुरस्कार विजेत्यांमध्ये यांचा समावेश:
पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये चोपडा उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब घोलप, श्वान पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल फुसे, रवींद्र गायकवाड, भरतसिंग पाटील अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, हवालदार आणि पोलीस नाईक यांचा समावेश आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे नितीन बाविस्कर आणि अकरम शेख यांच्यासह जिल्हा विशेष शाखेच्या मीनाक्षी सावळे यांनाही या सन्मानाने गौरवण्यात आले आहे.
पोलीस दलात उत्साहाचे वातावरण:
या गौरवास्पद कामगिरीबद्दल जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. “हा सन्मान केवळ वैयक्तिक नसून संपूर्ण जळगाव पोलीस दलाच्या सांघिक प्रयत्नांचे फळ आहे,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. या यशामुळे जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाचा गौरव वाढला असून सर्व स्तरांतून पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. जळगाव पोलीस दलात सध्या आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.



