Home राष्ट्रीय सामान्य नागरिकांसाठी इस्रोचे ऐतिहासिक पाऊल; अंतराळवीर होण्याची संधी !

सामान्य नागरिकांसाठी इस्रोचे ऐतिहासिक पाऊल; अंतराळवीर होण्याची संधी !


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)ने प्रथमच सामान्य नागरिकांसाठी अंतराळवीर कॅडर खुले करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून भारताच्या अंतराळ मोहिमेत हा ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे. इस्रोच्या अंतराळवीर निवड समितीने गगनयान मोहिमेच्या दुसऱ्या तुकडीत वायुसेनेच्या वैमानिकांसोबत STEM क्षेत्रातील चार सामान्य तज्ज्ञांचा समावेश करण्याची शिफारस केली आहे.

सध्या गगनयानच्या पहिल्या तुकडीत केवळ भारतीय वायुसेनेतील टेस्ट पायलट्सचा समावेश आहे. मात्र भविष्यातील मोहिमा आणि संशोधनासाठी दुसऱ्या बॅचमध्ये सामान्य नागरिकांना संधी देण्यात येणार आहे. एका अंतराळवीराच्या निवड व प्रशिक्षणासाठी सुमारे साडेचार वर्षे लागणार असून 2030 पर्यंत दुसरी तुकडी तयार होण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

समितीच्या योजनेनुसार चौथ्या मानवी गगनयान मिशनपासून नागरी अंतराळवीर प्रत्यक्ष क्रूमध्ये सहभागी होऊ शकतील. सुरुवातीच्या टप्प्यात तंत्रज्ञान परिपक्व होईपर्यंत लष्करी वैमानिकांवर भर दिला जाणार असून त्यानंतर नागरिकांना अधिक संधी दिली जाईल.

गगनयान हा इस्रोचा पहिला मानवयुक्त अंतराळ कार्यक्रम असून 2027 पर्यंत तीन अंतराळवीरांना 400 किमी उंचीवर तीन दिवसांच्या मोहिमेसाठी पाठवण्याची तयारी सुरू आहे. पहिल्या तुकडीत एअर कमांडर प्रशांत बी. नायर, ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला, अजित कृष्णन आणि अंगद प्रताप यांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे तिसऱ्या बॅचमध्ये 12 अंतराळवीरांपैकी 10 सामान्य नागरिक असतील, अशीही योजना आहे. भारतीय अंतराळ स्थानक उभारणीच्या पार्श्वभूमीवर वार्षिक दोन मानवी मोहिमा आणि 40 अंतराळवीरांचा कायमस्वरूपी गट तयार करण्याची तयारी इस्रो करत आहे.

दरम्यान, प्रशिक्षण पायाभूत सुविधा, लाइफ सपोर्ट सिस्टम आणि कायमस्वरूपी केंद्रांची उभारणी ही मोठी आव्हाने इस्रोसमोर आहेत. तरीही सामान्य भारतीयांसाठी अंतराळाचे दरवाजे उघडण्याच्या दिशेने भारताने टाकलेले हे पाऊल ऐतिहासिक मानले जात आहे.


Protected Content

Play sound