Home क्राईम दारूसाठी पैसे न दिल्याने महिलेला बेदम मारहाण व धमकी !

दारूसाठी पैसे न दिल्याने महिलेला बेदम मारहाण व धमकी !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. दारू पिण्यासाठी ५०० रुपयांची मागणी करून, ते न दिल्याने एका महिलेच्या डोक्यात दगड घालून तिला गंभीर जखमी केल्याची घटना तांबापुरा मच्छी बाजार परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरात खळबळ उडाली आहे.

युसूफ मुसा खटीक (वय ६४, रा. तांबापुरा) यांची पत्नी सलमाबी या २६ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास पाणी भरत होत्या. यावेळी संशयित आरोपी मोहम्मद शेख मेहमुद याने त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी ५०० रुपयांची मागणी केली. सलमाबी यांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. या रागातून आरोपीने जवळच पडलेला दगड उचलून सलमाबी यांच्या डोक्यात मारला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. इतकेच नाही तर आरोपीने फिर्यादी युसूफ खटीक यांच्या खिशातील ५०० रुपयेही जबरीने हिसकावून नेले.

या घटनेनंतर जखमी महिलेला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, हा वाद इथेच संपला नाही. २७ एप्रिल रोजी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास संशयित आरोपी मोहम्मद शेख मेहमुद यांचे वडील मेहमुद शेख मेहबूब यांनी रुग्णालयाबाहेर येऊन युसूफ खटीक यांना गाठले आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या सर्व प्रकारानंतर युसूफ खटीक यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे हे करीत आहे.


Protected Content

Play sound