Home Cities जळगाव पनीरऐवजी “चीज ॲनालॉग” वापरल्यास स्पष्ट माहिती द्या; अन्यथा कारवाईचा इशारा

पनीरऐवजी “चीज ॲनालॉग” वापरल्यास स्पष्ट माहिती द्या; अन्यथा कारवाईचा इशारा


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत सर्वासामान्य जनतेस सकस व सुरक्षित, निर्भेळ व योग्य माहिती असलेले अन्नपदार्थ उपलब्ध करून देणे बंधनकारक असून रेस्टॉरंट, केटरर्स, हॉटेल्स व फास्ट फूड विक्रेत्यांनी अन्नपदार्थ तयार करताना वापरण्यात येणाऱ्या “चीज अॅनालॉग” बाबत ग्राहकांना स्पष्ट माहिती देणे आवश्यक आहे, असे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

राज्यात काही ठिकाणी पनीरऐवजी “चीज अॅनालॉग”चा वापर करून अन्नपदार्थ तयार केले जात असून त्याबाबत ग्राहकांना माहिती न दिल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. तसेच काही विक्रेते “चीज अॅनालॉग” किंवा “पनीर अॅनालॉग” हे पदार्थ “पनीर” किंवा “चीज” या नावाने विक्री करत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे ग्राहकांची दिशाभूल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अन्न सुरक्षा व मानके (अन्नपदार्थ मानके व अन्न मिश्रित पदार्थ) विनियम, २०११ नुसार “पनीर” हा केवळ दुधापासून तयार होणारा पदार्थ आहे. तर “डेअरी अॅनालॉग” किंवा “चीज अॅनालॉग” हे पदार्थ इतर घटकांपासून तयार केले जातात. त्यामुळे या दोन्ही पदार्थांमध्ये स्पष्ट फरक असून त्याची योग्य माहिती देणे आवश्यक आहे.

अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ च्या तरतुदीनुसार अन्नपदार्थ विक्री करताना ग्राहकांना त्यातील घटकांची माहिती देणे बंधनकारक आहे. तसेच लेबलिंग व डिस्प्ले नियम, २०२० नुसार मेनूकार्ड, इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड व बिलावर “चीज अॅनालॉग” असा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक आहे.

रेस्टॉरंट, हॉटेल्स, केटरर्स व फास्ट फूड विक्रेत्यांनी अन्नपदार्थ तयार करताना चीज अॅनालॉगचा वापर केल्यास त्याची स्पष्ट नोंद मेनूकार्ड व बिलावर करावी, अन्यथा संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.

तसेच अन्न व्यवसायिकांनी परवाना घेताना दिलेला मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी अद्ययावत ठेवणे आवश्यक असून चुकीची माहिती दिल्यास कारवाई करण्यात येणार आहे.

ग्राहकांनी पनीर खरेदी करताना लेबल तपासावे, संशय असल्यास बिल घ्यावे तसेच हॉटेलमध्ये ऑर्डर देताना पनीर व चीज अॅनालॉग यामधील फरक लक्षात घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ग्राहकांची दिशाभूल झाल्यास १८००-२२२-३६५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन अन्न सुरक्षा आयुक्त श्री. श्रीधर डुबे-पाटील यांनी केले आहे.


Protected Content

Play sound