Home Cities जळगाव टेट परीक्षेतील कथित पेपरफुटीविरोधात छत्रपती शिवाजी ब्रिगेडचा एल्गार  

टेट परीक्षेतील कथित पेपरफुटीविरोधात छत्रपती शिवाजी ब्रिगेडचा एल्गार  

0
5


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) मधील कथित पेपरफुटी व परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकारांच्या निष्पक्ष, स्वतंत्र व सखोल चौकशीची मागणी करत छत्रपती शिवाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेतली आहे. दोषींवर कठोर कारवाई करावी अन्यथा १३ जुलै २०२६ पासून शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा संघटनेने दिला आहे.

छत्रपती शिवाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, TET परीक्षा ही लाखो बेरोजगार तरुणांच्या भविष्याशी थेट संबंधित असून वारंवार समोर येणाऱ्या कथित पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचा परीक्षेवरील विश्वास डळमळीत झाला आहे. या परीक्षेसाठी उमेदवार अनेक महिने परिश्रम करून हजारो रुपये खर्च करतात, मात्र गैरप्रकारांमुळे त्यांचे आर्थिक, मानसिक आणि शैक्षणिक नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. राज्यात शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे असल्याने शिक्षण व्यवस्थेवरही प्रतिकूल परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत परीक्षा प्रक्रिया पारदर्शक आणि सुरक्षित ठेवणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. तसेच वारंवार घडणाऱ्या कथित पेपरफुटीमुळे राज्यातील बेरोजगारीची समस्या अधिक गंभीर होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

निवेदनात दिलेल्या माहितीनुसार यावर्षी TET परीक्षेला राज्यभरातून सुमारे ६,००,१२८ उमेदवारांनी हजेरी लावली असून प्रत्येकी ₹१,००० शुल्क आकारल्याने शासनाकडे सुमारे १६० कोटींहून अधिक महसूल जमा झाला आहे. याशिवाय प्रशिक्षण, क्लासेस आणि अभ्यासासाठी विद्यार्थ्यांचा मोठा खर्च होत असून एकूण आर्थिक भार कोट्यवधी रुपयांपर्यंत पोहोचत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. संघटनेने १२ महत्त्वाच्या मागण्या मांडल्या असून त्यामध्ये TET परीक्षेतील कथित गैरप्रकारांची स्वतंत्र चौकशी, दोषींवर जलदगती न्यायालयात कारवाई, प्रश्नपत्रिका प्रक्रियेचे तृतीय पक्ष ऑडिट, परीक्षा रद्द झाल्यास शुल्क परतावा, वयोमर्यादा सवलत, उत्तरतालिका व उत्तरपत्रिका सार्वजनिक करणे, तसेच AI व सायबर सुरक्षा प्रणालीद्वारे परीक्षा प्रणाली मजबूत करणे यांचा समावेश आहे.

तसेच निकालातील अनियमितता, अभ्यासक्रम व मूल्यमापन प्रक्रियेचा पुनर्विचार, शिक्षक भरती प्रक्रियेतील नियमांचा अभ्यास, आणि भविष्यात पेपरफुटी रोखण्यासाठी डिजिटल सुरक्षा प्रणाली विकसित करण्याची मागणीही करण्यात आली आहे. संघटनेचे म्हणणे आहे की, मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न झाल्यास १३ जुलै २०२६ पासून पुण्यात शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने शांततापूर्ण पण तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. या आंदोलनाची जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही देण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे अशोक एस. शिंदे यांनी हे निवेदन राज्यभरातील लाखो उमेदवारांच्या भवितव्याशी जोडलेले असून न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असे स्पष्ट केले आहे.


Protected Content

Play sound