Home क्रीडा महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुखपदी सुनील गुरव यांची फेरनियुक्ती

महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुखपदी सुनील गुरव यांची फेरनियुक्ती


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । उत्तर महाराष्ट्रात योग चळवळीला बळकटी देणारे योग शिक्षक सुनील मधुकर गुरव यांची महाराष्ट्र योग शिक्षक संघाने उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख म्हणून पुन्हा एकदा फेरनियुक्ती केली आहे. त्यांच्या कार्यकुशलतेची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला असून, विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सुनील गुरव यांच्या या नियुक्तीबद्दल जिल्हा कार्यकारिणी सदस्यांसह ओम् योगा ग्रुप, सन योगा ग्रुप आणि माऊली योगा क्लासच्या सर्व साधकांनी आनंद व्यक्त केला आहे. गुरव यांनी यापूर्वी एप्रिल २०२२ ते मार्च २०२५ या कालावधीत महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या जळगाव जिल्हा समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला होता. या काळात त्यांनी संघटनात्मक कामकाजासोबतच योगाच्या प्रसारासाठी उल्लेखनीय योगदान दिले.

त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावरच एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीसाठी त्यांना उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. या पदावर कार्यरत असताना त्यांनी संपूर्ण जिल्हा कार्यकारिणीला सोबत घेऊन विविध ठिकाणी योगाचे शिबिरे आयोजित केली. ग्रामीण आणि शहरी भागात जाऊन त्यांनी योगाचे महत्त्व पटवून दिले आणि लोकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण केली.

गुरव यांच्या नेतृत्वाखाली योगाचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला असून, अनेक नव्या साधकांनी योगाभ्यासाची सवय अंगीकारली आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे योग चळवळीला नवसंजीवनी मिळाली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत पुन्हा एकदा त्यांच्यावर विभाग प्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याने त्यांच्या पुढील वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound