Home Cities जळगाव जळगावात कोळी समाज बहुउद्देशीय प्रतिष्ठानतर्फे ‘मोफत सामूहिक विवाह सोहळा’!

जळगावात कोळी समाज बहुउद्देशीय प्रतिष्ठानतर्फे ‘मोफत सामूहिक विवाह सोहळा’!


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वाढत्या महागाईच्या काळात लग्नासाठी होणारा अवास्तव खर्च आणि त्यानंतर उरणाऱ्या कर्जाच्या विळख्यातून समाजाला मुक्त करण्याच्या उद्देशाने, ‘कोळी समाज बहुउद्देशीय प्रतिष्ठान, जळगाव’ सज्ज झाले आहे. यावर्षी प्रतिष्ठानच्या वतीने चौथ्या ‘मोफत सामूहिक विवाह संस्कार सोहळ्याचे’ आयोजन करण्यात आले असून, गरजू आणि विवाहेच्छुक वधू-वरांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे, असल्याचे माहिती प्रसिद्धी प्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांनी दिली. ते शनिवार. १८ एप्रिल रोजी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

११ मे रोजी सोहळा

हा भव्य विवाह सोहळा सोमवार ११ मे रोजी दुपारी १२.३० वाजता सरदार वल्लभभाई पटेल हॉल (बी.एस.एन.एल. ऑफिसच्या मागे, जळगाव) येथे संपन्न होणार आहे. सामाजिक दायित्व म्हणून संस्था गेल्या काही वर्षांपासून हा उपक्रम राबवत असून, त्याला समाजातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

काय मिळणार सुविधा?

या विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वधू-वरांना लग्नासाठी लागणारे कपडे, बूट-चप्पल आणि संसारोपयोगी वस्तू मोफत पुरवल्या जाणार आहेत. तसेच, त्यांना शासकीय योजनांचे लाभ व अनुदान मिळवून देण्यासाठीही संस्थेमार्फत सहकार्य केले जाणार आहे. लग्नासाठी भव्य स्टेज, मंडप, वाजंत्री आणि जेवणाची उत्तम सोय संस्थेतर्फे करण्यात आली आहे. वधू-वरांची एकत्र भव्य शोभायात्रा काढली जाणार असून, त्यानंतर लग्नविधी पार पडणार आहेत.

नोंदणीसाठी ३० एप्रिलची अंतिम मुदत

विवाहेच्छुक वधू-वरांनी नोंदणीसाठी ३० एप्रिल २०२६ पर्यंत श्री शनिमंदिरा समोरील संस्थेच्या कार्यालयात संपर्क साधावा. नोंदणीसाठी लिविंग सर्टिफिकेट, आधार कार्ड, पासपोर्ट फोटो आणि संमतीपत्र सोबत असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, सहभागी वधू-वरांनी एक दिवस आधी येऊन हळदीचा कार्यक्रम पार पाडवा, असे आवाहन संस्थेने केले आहे.

कर्जमुक्त लग्नाचे आवाहन

“लग्नाकरीता कर्ज करावे – जन्मभरी व्याज भरावे, लग्नासाठी कफल्लक व्हावे – कोण्या देवे सांगीतले?” हा संदेश देत, समाजात होणारा अनावश्यक खर्च टाळून साध्या पद्धतीने पण थाटात लग्न करण्याचे आवाहन संस्थेने केले आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक नागरिकांनी ७३८५०८६७७७, ७७९८२१४२२९ किंवा ८७८८५६२४३० या क्रमांकावर संपर्क साधावा.



Protected Content

Play sound