
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथे १८ एप्रिल २०२६ रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर (महिला विभाग), आदिवासी विकास केंद्र, लोक समन्वय प्रतिष्ठान आणि जळगाव जिल्हा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने “आदिवासी महिला विकास कार्यशाळा” अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या कार्यशाळेत जळगाव जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या आदिवासी महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत विकासप्रक्रियेतील विविध पैलूंवर सखोल चर्चा केली.

उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि परिचय प्रशांत ईखार आणि सचिन धांडे यांनी केला. जळगाव जिल्हा केंद्र अध्यक्ष रवींद्र भैय्यासाहेब पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
हवामान अभ्यासक व पत्रकार संजना खंडारे यांनी हवामान बदलाच्या संकटावर प्रकाश टाकला. पावसाच्या अनियमिततेमुळे शेती आणि मानवी जीवनावर होणारे विपरीत परिणाम त्यांनी सविस्तर स्पष्ट केले. पावसाचे बदलणारे प्रमाण, अवकाळी पाऊस आणि पाण्याची निर्माण झालेली टंचाई यामुळे महिलांवर कामाचा ताण कसा वाढला आहे, याचा वेध त्यांनी घेतला. हवामान बदलाचा थेट परिणाम महिलांच्या मानसिक आणि सामाजिक आरोग्यावर होत असल्याचे सांगत, त्यांनी या विषयावर महिलांनी मोकळेपणाने संवाद साधण्याचे आवाहन केले. या चर्चेत सहभागी होत सायरा तडवी यांनी आपल्या गावातील हवामानातील बदल आणि त्याचा दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम यावर आपले अनुभव मांडले.
कार्यशाळेत महिलांच्या आरोग्याबाबत विशेष सखोल चर्चा झाली. जळगाव जिल्हा केंद्र सचिव डॉ. राहुल मयुर यांनी बदलती जीवनशैली आणि पर्यावरणाचा महिलांच्या आरोग्यावर होणारा परिणाम यावर मार्गदर्शन केले. मलेरिया, कुपोषण आणि मानसिक आरोग्याच्या समस्या वेगाने वाढत असल्याचे सांगत त्यांनी वेळेवर निदान आणि उपचारांचे महत्त्व सांगितले. विशेषतः मातृ व बाल आरोग्याची काळजी घेणे, गर्भारपणातील पथ्ये, योग्य आहार आणि आयर्न व जीवनसत्त्वांच्या गोळ्यांचे नियमित सेवन याकडे त्यांनी लक्ष वेधले. सिकलसेल आणि स्तनाच्या कर्करोगासारख्या आजारांविषयी जनजागृतीची गरज व्यक्त करत, आशा वर्करशी नियमित संपर्क आणि आरोग्य सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी महिलांना केले.
शासकीय योजनांची माहिती देताना जळगाव जिल्हा आदिवासी विकास विभागाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी संदीप पाटील यांनी महिलांसाठी उपलब्ध असलेले बचत गट, स्वयंरोजगार, शिक्षण आणि कर्जसुविधांची सविस्तर माहिती दिली. संगणक केंद्रांमुळे अर्ज प्रक्रिया आता सुलभ झाली असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे जळगाव उपजिल्हाधिकारी (निवडणूक) अर्चना मोरे यांनी समुदाय वनहक्क (CFR), मनरेगाचा प्रभावी वापर आणि मतदार नोंदणीच्या प्रक्रियेवर मार्गदर्शन केले. जळगाव जिल्हा कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांनी बदलत्या हवामानानुसार शेती आणि लघुउद्योगांच्या संधी शोधण्याचे आवाहन महिलांना केले. शिक्षण आणि कौशल्य विकासाद्वारे महिलांनी स्वावलंबी बनावे, असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय अध्यक्ष, लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी स्वशासन आणि आदिवासी महिलांचे अधिकार या विषयावर मार्गदर्शन करताना संघटित शक्तीचा विजय होतो, असे सांगितले. वनहक्क, जमीन हक्क आणि ग्रामपंचायत सक्षमीकरणावर त्यांनी विशेष भर दिला. विविध भागांतील महिलांच्या समस्या जरी वेगळ्या असल्या तरी एकत्रित पुढाकार घेतल्यास त्या सोडवता येतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यशाळेत महिलांनी पाणीटंचाई, आरोग्याच्या सोयींचा अभाव आणि स्थलांतरासारखे प्रश्न मांडले. या प्रश्नांवर चर्चा करून शासनाच्या योजना गावपातळीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. कोषाध्यक्ष प्रा. डी. पी. पवार यांनी आभार मानले.



