Home Cities जळगाव समन्वय 2026 फॅशन शोमध्ये पौराणिक देवतांचा अवतार ; विद्यार्थ्यांचे सजीव सादरीकरण

समन्वय 2026 फॅशन शोमध्ये पौराणिक देवतांचा अवतार ; विद्यार्थ्यांचे सजीव सादरीकरण


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगावातील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित ‘समन्वय 2026’ सप्ताहांतर्गत पार पडलेल्या फॅशन शोमध्ये विद्यार्थ्यांनी पौराणिक कथांतील देवतांचे सजीव सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. पारंपरिक आणि आधुनिकतेचा संगम साधणाऱ्या या अनोख्या उपक्रमामुळे महाविद्यालय परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या आग्नेय बॅचतर्फे १२ ते १८ एप्रिल या कालावधीत ‘समन्वय 2026’ चे आयोजन करण्यात आले असून, या सांस्कृतिक सप्ताहाची सुरुवात १२ एप्रिल रोजी आर्ट गॅलरीने झाली. त्यानंतर विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू असताना १५ एप्रिल रोजी आयोजित फॅशन शो हा विशेष आकर्षण ठरला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पौराणिक कथांतील विविध देव-देवतांचे आणि पात्रांचे वेष परिधान करून प्रभावी सादरीकरण केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, हृदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील, वैद्यकीय संचालक डॉ. एन. एस. आर्विकर, वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, रजिस्ट्रार प्रमोद भिरूड, तसेच विविध महाविद्यालयांचे प्राचार्य व मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी धन्वंतरी पूजन व स्व. गोदावरी आजी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.

या फॅशन शोमध्ये एकूण २२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. मंदार कुकुलवार यांनी मत्स्य, स्वराज सूर्य यांनी कूर्म, वैष्णवी देशमुख यांनी मोहिनी, अमित पाटील यांनी वराह, विशाखा पाटील-कजरखाने यांनी नरसिंह, सार्थक मडके यांनी हिरण्यकश्यपू, कृषिव जेठवा यांनी प्रल्हाद, स्वरूप कालेकर यांनी वामन, कृष्णा गायगोळ यांनी राजा बळी, भुवन चव्हाण यांनी राम, अमित शिंदे यांनी लक्ष्मण, संस्कृती पाटील यांनी सीता, अर्पित पाटील यांनी कृष्ण, अमन चौहान यांनी कालिया नाग, माही गडपायले यांनी राधा, समृद्धी मुत्तेपवार व अपूर्व पाटील यांनी असुर, तर मिहीर पाटील यांनी विष्णू अशा विविध भूमिका साकारत प्रेक्षकांची दाद मिळवली.

स्पर्धेचे परीक्षण अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके आणि कविता देशमुख यांनी केले. कार्यक्रमाला वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक, डॉक्टर्स व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन पायल पाटील व सतप्रीत कोकाटे यांनी केले, तर चैतन्य पाटील, परीक्षित प्रजापती, प्रज्ञा दुधमल आणि विशाखा काजरखाने यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळाले असून, पौराणिक संस्कृतीचे आधुनिक माध्यमातून सादरीकरण करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला. ‘समन्वय 2026’ अंतर्गत येणाऱ्या पुढील कार्यक्रमांबद्दलही विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.


Protected Content

Play sound