Home क्राईम धावत्या कारने अचानक घेतला पेट : मोठा अनर्थ टळला

धावत्या कारने अचानक घेतला पेट : मोठा अनर्थ टळला


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या शास्त्री टावर चौकातील बस स्थानकाजवळ बुधवारी १५ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास एका धावत्या कारने अचानक पेट घेतल्याची खळबळजनक घटना घडली. परिसरातील जागरूक नागरिक आणि तरुणांच्या प्रसंगावधानामुळे कारमधील दाम्पत्य सुरक्षित बाहेर पडले असून, मोठी जीवितहानी टळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर परिसरातील हरिओम नगरात राहणारे प्रकाश चिंधा पाटील हे आपल्या पत्नीसह कार (क्रमांक एमएच १९ बीयू ७५६२) ने जळगाव शहराकडून छत्रपती शिवाजीनगर उड्डाणपुलाकडे जात होते. शास्त्री टावर चौकातून जात असताना अचानक कारच्या बोनेटमधून धूर निघू लागला. कारला आग लागल्याचे लक्षात येताच रस्त्यावरील काही सतर्क तरुणांनी आरडाओरडा करून चालकाला गाडी थांबवण्यास सांगितले.

तरुणांनी तातडीने धाव घेत प्रकाश पाटील व त्यांच्या पत्नीला कारबाहेर सुखरूप काढले. त्यानंतर काही तरुणांच्या मदतीने कारचे बोनेट उघडून त्यावर पाण्याचा मारा करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच जळगाव महानगरपालिकेचा अग्निशमन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला आणि जवानांनी आग पूर्णपणे विझवली. प्राथमिक अंदाजानुसार, ही आग बॅटरीच्या शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे समजते.

या दुर्घटनेत कारचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. भररस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. या संदर्भात सायंकाळपर्यंत पोलिसांत कोणतीही अधिकृत नोंद करण्यात आलेली नव्हती.


Protected Content

Play sound