Home प्रशासन उष्णतेचा कहर ; अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी 

उष्णतेचा कहर ; अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी 


अकोला-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट सुरू असून राज्यभरात तापमानाने उच्चांक गाठला आहे. या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात उष्माघातामुळे पहिल्या मृत्यूची नोंद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन करण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात सूर्य अक्षरशः आग ओकत असून अकोला जिल्ह्यात तापमान 44 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. उष्णतेच्या तीव्रतेमुळे दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला असून पुढील तीन ते चार दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

अकोला शहरातील जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत एका मालवाहू ऑटोमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी प्राथमिक तपासात मृतदेहावर कोणत्याही प्रकारच्या मारहाणीच्या खुणा किंवा जखमा नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीचा मृत्यू उष्माघातामुळे झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, पश्चिम विदर्भातील अमरावती जिल्ह्यातही तापमान 43 अंशांच्या पुढे गेले असून दुपारच्या वेळेत रस्ते निर्मनुष्य झाल्याचे चित्र दिसत आहे. उष्णतेमुळे नागरिक घराबाहेर पडणे टाळत असून बाजारपेठांमधील वर्दळही कमी झाली आहे. पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये तापमान 42 अंशांच्या जवळ पोहोचल्याने नागरिक हैराण झाले आहेत. वाढत्या उष्णतेचा परिणाम लहान मुलांवरही होत असून बाल रुग्णालयांमध्ये डायरिया व तापाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. दूषित पाणी आणि उकाडा यामुळे ही परिस्थिती निर्माण होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आरोग्य विभागाने पालकांना मुलांची विशेष काळजी घेण्याचे आणि स्वच्छ पाणी पाजण्याचे आवाहन केले आहे.

मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातही तापमान 41 अंश सेल्सिअसवर पोहोचले असून यंदाच्या हंगामातील उच्चांक नोंदवला गेला आहे. उष्णतेमुळे बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणे ओस पडत आहेत. आरोग्य विभागाने नागरिकांना आवश्यकतेनुसारच बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे.

उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात तापमान 42.5 अंशांवर पोहोचले असून उन्हाच्या कडाक्यामुळे रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. काही ठिकाणी रस्त्यावरील डांबर वितळत असल्याचेही दिसून येत आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिक त्रस्त झाले असून उष्णतेपासून बचावासाठी विविध उपाययोजना करत आहेत.

ठाणे जिल्ह्यासाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला असून तापमान 40 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिक थंड पेयांचा वापर करत असून डोक्यावर टोपी, स्कार्फ वापरताना दिसत आहेत. उष्णतेचा फटका पादचारी आणि वाहनचालकांनाही बसत आहे.

यवतमाळ जिल्ह्यात तापमान 43.2 अंश सेल्सिअसवर पोहोचले असून नागरिक उष्णतेने हैराण झाले आहेत. एप्रिल आणि मे महिन्यात तापमान 44 ते 45 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.


Protected Content

Play sound