
बोदवड-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथे बुधवारी १५ एप्रिल रोजी दुपारी शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत शेतकऱ्याचे शेती साहित्य आणि मका जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र, ग्रामस्थांची सतर्कता आणि अग्निशामक दलाच्या वेळेत आगमनामुळे मोठा अनर्थ टळला असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरसाळा येथील शेतकरी बळीराम त्र्यंबक कोळी यांच्या शेताजवळ असलेल्या विद्युत वितरण कंपनीच्या डीपीवर दुपारी अचानक शॉर्टसर्किट झाले. या शॉर्टसर्किटमुळे ठिणग्या पडून परिसरात आग पसरली. आगीचे स्वरूप पाहून गावातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले.
या आगीच्या भक्ष्यस्थानी शेतकरी समाधान किसन पाटील यांचा शेतातील मका आणि सिंचनासाठी अंथरलेल्या ठिबक नळ्या आल्या. यात ठिबक संच पूर्णपणे जळून खाक झाला असून मका पिकाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आगीची माहिती मिळताच बोदवड येथून अग्निशामक दलाची गाडी काही वेळातच घटनास्थळी दाखल झाली.
अग्निशामक दल आणि ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आली, ज्यामुळे शेजारील इतर पिकांना लागणारा आगीचा वेध रोखता आला. वेळीच मदत मिळाल्याने मोठा धोका टळला असला, तरी नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासनाने तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.



