जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने जळगाव येथे एका विशेष अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात महामानवाच्या गौरवशाली कार्याचे स्मरण करत त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात पत्रकार संघाचे केंद्रीय अध्यक्ष नरेंद्र कदम आणि केंद्रीय सचिव भगवान सोनार यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या माल्यार्पणाने झाली. यावेळी उपस्थित पत्रकारांनी ‘जय भीम’च्या घोषणा देत परिसर उत्स्फूर्त केला. याप्रसंगी बोलताना मान्यवरांनी बाबासाहेबांच्या सामाजिक आणि राजकीय कार्यासोबतच त्यांच्या पत्रकारितेतील अतुलनीय योगदानावर विशेष प्रकाश टाकला.

जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विश्वजीत चौधरी यांनी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पत्रकारिता” या विषयावर सविस्तर विवेचन केले. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ आणि ‘बहिष्कृत भारत’ यांसारख्या नियतकालिकांच्या माध्यमातून शोषित आणि वंचितांचा आवाज कशा प्रकारे बुलंद केला, याची माहिती त्यांनी दिली. व्यावसायिक पत्रकारितेच्या पलीकडे जाऊन सामाजिक परिवर्तनाचे शस्त्र म्हणून पत्रकारितेचा वापर करण्याचा आदर्श बाबासाहेबांनी घालून दिला असून, तो आजही सर्व पत्रकारांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन चौधरी यांनी केले.
या अभिवादन सोहळ्याला जिल्हा अध्यक्ष चेतन वाणी, जिल्हा कार्याध्यक्ष हेमंत पाटील, शहराध्यक्ष जितेंद्र कोतवाल यांच्यासह लालचंद अहिरे, किशोर शिंपी, योगेश सुने, विकास चव्हाण आणि वसीम खान यांची प्रमुख उपस्थिती होती. पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी अधिक दृढ करण्याचा आणि सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा संकल्प याप्रसंगी करण्यात आला. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात या कार्यक्रमाची सांगता झाली.



