Home धर्म-समाज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभ्यासातून अभिवादन; बुलढाण्यात १२ तास वाचन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभ्यासातून अभिवादन; बुलढाण्यात १२ तास वाचन


बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । “वाचाल तर वाचाल” हा मंत्र देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा शहरात एका प्रेरणादायी उपक्रमाने अभिवादन करण्यात आले. येथील मृण्मयी मल्टीपर्पज क्लासेस आणि ध्रुव क्लासेसच्या वतीने सलग १२ तास वाचन आणि अभ्यास उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमात यंदाही विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी आणि केवळ उत्सवापुरते मर्यादित न राहता अभ्यासाच्या माध्यमातून स्वतःचे भविष्य उज्ज्वल करावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. सामाजिक, आर्थिक आणि वैचारिक परिवर्तनासाठी शिक्षण हेच प्रभावी शस्त्र आहे, हा बाबासाहेबांचा विचार कृतीत आणण्यासाठी या दोन्ही क्लासेसनी पुढाकार घेतला आहे. सकाळी सुरू झालेल्या या वाचन चळवळीमध्ये शहरातील विविध वयोगटातील १०० पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांनी सलग १२ तास एकाग्रतेने अभ्यास करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खऱ्या अर्थाने ज्ञानरूपी श्रद्धांजली अर्पण केली.
या स्तुत्य उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण होण्यास मदत होत असून, पालकांकडूनही या उपक्रमाचे मोठे कौतुक होत आहे. अशा उपक्रमांमधूनच भविष्यातील सुजाण आणि वैचारिक पिढी घडण्यास मदत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.


Protected Content

Play sound