Home Cities मुक्ताईनगर घोडसगाव जि.प. शाळेचा राज्यस्तरीय सन्मान; ‘आदर्श शाळा’ पुरस्काराने गौरव 

घोडसगाव जि.प. शाळेचा राज्यस्तरीय सन्मान; ‘आदर्श शाळा’ पुरस्काराने गौरव 


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव (पुनर्वसन) येथील जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक शाळेला “राज्यस्तरीय आदर्श शाळा” पुरस्कार मिळाल्याने जळगाव जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवला गेला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या अभिनव उपक्रमांमुळे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे या शाळेची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे.

ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने शिक्षण क्षेत्रात सातत्यपूर्ण आणि परिणामकारक कार्य करणाऱ्या शाळांचा गौरव करण्यासाठी “राज्यस्तरीय आदर्श शाळा” पुरस्कार प्रदान करण्यात येतो. राज्यातील प्रत्येक शाळा मॉडेल शाळा बनविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असून, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि उत्कृष्ट व्यवस्थापन यांचा विचार करून शाळांची निवड केली जाते.

घोडसगाव (पुनर्वसन) येथील जि.प. शाळेने शैक्षणिक गुणवत्ता, आधुनिक अध्यापन पद्धती, विद्यार्थी-केंद्रित उपक्रम आणि समाजाच्या सहभागातून उभारलेले शैक्षणिक वातावरण यामुळे उल्लेखनीय कामगिरी केली आहे. याच कार्याची दखल घेत या शाळेला ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

दिनांक २९ मार्च २०२६ रोजी पुणे येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात आयोजित ध्येय एज्युकेशन आयकॉन समिट २०२६ या भव्य कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात जिल्हा परिषद शाळांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणारे दत्तात्रय वारे गुरुजी यांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद दुट्टे तसेच शिक्षक भिका जावरे, सोमनाथ गोंडगिरे, गोपाल दुतोंडे आणि निता दुट्टे यांनी हा सन्मान स्वीकारला.

या कार्यक्रमाला आमदार राहुल दादा कुल, आमदार उमाताई खापरे, आमदार अमित घोडके, आमदार अरुण लाड, पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष विरधवल जगदाळे, पुणे महानगरपालिका उपमहापौर शर्मिला पवार तसेच जिल्हाधिकारी शुभम पवार यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सुमारे १५०० शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

विशेष म्हणजे, नुकत्याच घेण्यात आलेल्या ध्येय प्रकाशन महाराष्ट्र यांच्या स्पर्धा परीक्षेत या शाळेतील तब्बल १९ विद्यार्थी गुणवत्ता यादीत स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत. या यशामुळे शाळेची शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांची प्रगती अधोरेखित झाली आहे.

या राज्यस्तरीय पुरस्कारामुळे घोडसगाव शाळेचे सर्वत्र अभिनंदन होत असून, ग्रामीण भागातील शाळाही योग्य नियोजन, मेहनत आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोनातून उत्कृष्ट कामगिरी करू शकतात, याचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.


Protected Content

Play sound