Home Cities जळगाव अवकाळी पावसाचा कहर ; चांदसर परिसरात मका भुईसपाट

अवकाळी पावसाचा कहर ; चांदसर परिसरात मका भुईसपाट


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने अक्षरशः कहर माजवला असून, वादळी वारे, गारपीट आणि मुसळधार पावसामुळे हजारो हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाली आहेत. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून, तातडीने मदतीची मागणी जोर धरत आहे.

बुधवारी रात्री साडेदहा वाजल्यानंतर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पावसाने जोरदार हजेरी लावली. या तडाख्यामुळे मका, बाजरी, गहू, केळी तसेच विविध फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी उभ्या पिकांची अक्षरशः चिरफाड झाली असून, शेतांमध्ये पाणी साचल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.

जळगाव तालुक्यातील चांदसर परिसरात सर्वाधिक फटका बसला असून, काढणीसाठी तयार असलेला मका वादळी वाऱ्यामुळे पूर्णपणे भुईसपाट झाला आहे. कापसाला अपेक्षित भाव न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी पर्याय म्हणून मक्याची लागवड केली होती. मात्र, काढणीच्या उंबरठ्यावर असताना आलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याची भावना व्यक्त होत आहे.

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या अवकाळी पावसामुळे नुकसानाचा आकडा सातत्याने वाढत आहे. दोन दिवसांपूर्वी सुमारे नऊ हजार हेक्टरवरील पिके बाधित झाल्याची नोंद होती, मात्र बुधवारी रात्रीच्या तडाख्यानंतर हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून प्राथमिक पाहणी सुरू असली तरी नुकसानाचे खरे चित्र पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे तातडीने पंचनामे करण्याची आणि आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे. शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांसाठी ही परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून, त्वरीत दिलासा मिळावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound