Home क्राईम टार्गेटच्या तणावाने घेतला बळी ; जळगावात कँडल मार्च

टार्गेटच्या तणावाने घेतला बळी ; जळगावात कँडल मार्च


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह जे. अखिलेश यांच्या आत्महत्येच्या घटनेने औषध उद्योगातील कामकाज पद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित व्यवस्थापनावर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. जळगाव शहरात या घटनेच्या निषेधार्थ मेडिकल प्रतिनिधी संघटनांकडून कँडल मार्च काढण्यात आला, ज्यामध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

औषध उद्योगात सेल्स टार्गेट पूर्ण करण्यासाठी प्रतिनिधींवर वाढता आर्थिक व मानसिक ताण टाकला जात असल्याचे आरोप यावेळी करण्यात आले. विशेषतः जीएसटी लागू झाल्यानंतर “एक देश, एक कर” या धोरणामुळे बाजारातील स्पर्धा अधिक तीव्र झाली असून, जास्त सवलत देणारे स्टॉकिस्ट बाजारपेठेवर वर्चस्व गाजवत आहेत. यामुळे नियुक्त क्षेत्राबाहेरही औषध विक्रीची प्रथा वाढली असून, त्याचा थेट परिणाम प्रतिनिधींवर होत असल्याचे सांगण्यात आले.

हैदराबाद येथील २३ वर्षीय जे. अखिलेश यांनी अशाच दबावाला कंटाळून आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याचा आरोप सहकाऱ्यांकडून करण्यात आला. प्रामाणिकपणे काम करूनही टार्गेट पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करण्याची सक्ती त्यांना मान्य नव्हती. या त्रासातून सुटका मिळवण्यासाठी त्यांनी कंपन्या बदलण्याचा प्रयत्न केला, मात्र संबंधित व्यवस्थापनातील व्यक्तींनी त्यांचा पाठलाग करत पुन्हा दबाव आणल्याचे आरोप करण्यात आले. या सततच्या मानसिक छळामुळे त्यांनी टोकाचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.

या पार्श्वभूमीवर देशभरातील वैद्यकीय प्रतिनिधी संघटनांकडून जिल्हास्तरावर कँडल मार्च काढून निषेध नोंदवला जात आहे. जळगाव शहरातील काव्य रत्नावली चौक येथे आयोजित कँडल मार्चमध्ये मोठ्या संख्येने प्रतिनिधी सहभागी झाले. यावेळी अखिल भारतीय संघटना एफएमआरएआयचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉम्रेड नरेंद्र सिंह तसेच आयएमएचे अध्यक्ष डॉ. शशिकांत गाजरे उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येत स्वर्गीय अखिलेश यांना श्रद्धांजली अर्पण केली.

संघटनेच्या वतीने संबंधित कंपनीच्या व्यवस्थापनाविरोधात सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच औषध उद्योगातील कामकाज अधिक पारदर्शक आणि मानवीय करण्यासाठी तातडीने सुधारणा कराव्यात, असा आग्रहही धरण्यात आला. या संदर्भात कंपनीच्या व्यवस्थापनाला डीलर्समार्फत निवेदन पाठविण्यात आले आहे.


Protected Content

Play sound