Home Cities जळगाव शहीद दिनी कोरोना योद्ध्यांची पदयात्रा; कायम नोकरी व भत्त्यासाठी प्रशासनाकडे मागण्या

शहीद दिनी कोरोना योद्ध्यांची पदयात्रा; कायम नोकरी व भत्त्यासाठी प्रशासनाकडे मागण्या


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  शहीद दिनाच्या निमित्ताने जळगावात कंत्राटी कोरोना योद्धा संघर्ष समितीच्या वतीने पदयात्रा मोर्चाचे साेमवार, २३ मार्च रोजी आयोजन करण्यात आले. कोविड काळात सेवा बजावलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला असून, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

जळगाव रेल्वे स्थानक परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीस अभिवादन करून पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. या मोर्चात मोठ्या संख्येने कोरोना योद्ध्यांनी सहभाग घेतला. कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आता आपल्या हक्कासाठी आवाज उठवला आहे.

मोर्चाच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या निवेदनात प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. कोविड काळात सेवा दिलेल्या अनुभवी कंत्राटी कामगारांना शासनाच्या नियमित पदांवर कायमस्वरूपी नियुक्ती देण्यात यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. तसेच, कायमस्वरूपी नोकरी मिळेपर्यंत दरमहा १० हजार रुपयांचा ‘कोरोना योद्धा भत्ता’ सुरू करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

याशिवाय, कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे कारण देत कामावरून कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NRHM, NHM) व इतर आरोग्य विभागातील रिक्त पदांवर प्राधान्याने नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. आरोग्य विभागातील कक्षसेवक, बेड सहाय्यक, अँब्युलन्स चालक, डेटा एंट्री ऑपरेटर यांसारख्या पदांवर नवीन संधी निर्माण करून या कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तसेच, स्मार्ट कंपनीमार्फत करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत ती भरती तत्काळ रद्द करून उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याचीही मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे. याचबरोबर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे पारदर्शक भरती प्रक्रिया राबवून अनुभवी कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्याची मागणीही करण्यात आली.

कोविड काळात सेवा बजावलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना आजही नोकरीपासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप करत त्यांना तातडीने कामावर रुजू करून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच, शासन स्तरावर निर्णय होईपर्यंत स्मार्ट सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीमार्फत तात्पुरत्या स्वरूपात काम देण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदनावर निलेश बोरा, गोकुळ सावळे,जितेंद्र वाणी, सिमा मोरे, प्रेमराज पाटील, उज्वल गोयर, भुषण पाटील, चंद्रशेखर पाटील, सागर बाविस्कर, प्रेम मगरे, राहुल करोशिया, लिना करोशिया, यश कुमावत आदींची स्वाक्षरी आहे.


Protected Content

Play sound