
अहमदाबाद-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना आज ८ मार्च रोजी अहमदाबादमधील भव्य नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगत आहे. क्रिकेटप्रेमींच्या उत्सुकतेच्या शिखरावर पोहोचलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. टीम इंडियासाठी अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी डावाची सुरुवात केली असून पहिल्या 3 षटकांनंतर भारताने बिनबाद 38 धावा केल्या आहेत.

टॉसनंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी प्रथम फलंदाजी करण्यास आपण आनंदी असल्याचे सांगितले. अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ व्यवस्थापनाने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल न करता सेमीफायनलमध्ये खेळलेल्या संघालाच संधी देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे संघातील संतुलन कायम ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे मानले जात आहे.
दुसरीकडे न्यूझीलंडचे कर्णधार मिशेल सँटनर यांनी संघात एक बदल केला आहे. वेगवान गोलंदाज जेकब डफीला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले असून त्याने स्पिनर कोल मॅककॉन्चीची जागा घेतली आहे. अंतिम सामन्यात वेगवान गोलंदाजीचा फायदा घेण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.
न्यूझीलंड संघाच्या प्लेइंग-११ मध्ये टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), फिन ऍलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिशेल सँटनर (कर्णधार), जेकब डफी, मॅट हेन्री आणि लॉकी फर्ग्युसन यांचा समावेश आहे. तर भारतीय संघाच्या प्लेइंग-११ मध्ये संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), शिवम दुबे, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांचा समावेश आहे.
नरेंद्र मोदी स्टेडियमवरील या भव्य अंतिम सामन्याकडे जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. भारत तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याच्या प्रयत्नात असताना न्यूझीलंड संघही पहिल्यांदाच ही प्रतिष्ठेची ट्रॉफी जिंकण्याच्या निर्धाराने मैदानात उतरला आहे.



