Home क्रीडा राष्ट्रीय पिस्टल शूटिंगपटू सहीष्णा सोमवंशीचा विशेष सत्कार

राष्ट्रीय पिस्टल शूटिंगपटू सहीष्णा सोमवंशीचा विशेष सत्कार

0
11


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, क्रीडा आणि स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील उल्लेखनीय यशाचा गौरव करण्यासाठी आयोजित सन्मान सोहळा जळगावातील नूतन मराठा महाविद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. दहावी-बारावी परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांसह विविध स्पर्धा परीक्षा आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरली ती राष्ट्रीय स्तरावरील पिस्टल शूटिंगपटू कु. सहीष्णा सचिन सोमवंशी हिचा विशेष सत्कार.

राष्ट्रीय पातळीवरील पिस्टल शूटिंग स्पर्धांमध्ये महाराष्ट्रासह भारताचे प्रतिनिधित्व करत पदकांची कमाई करणाऱ्या सहीष्णा सोमवंशीच्या उल्लेखनीय कामगिरीचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. तिच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे आणि देशासाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानाचे कौतुक करत उपस्थितांनी तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तिचा सन्मान उपस्थित विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.

या कार्यक्रमाला विशेष पोलीस महानिरीक्षक तथा उपमहासमादेश्क, होमगार्ड, महाराष्ट्र राज्य, मुंबई डॉ. जालिंदर सुपेकर, तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता राजेश मोरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. निलेश देविदास पाटील, आदिवासी विकास विभागाचे उपसंचालक कपिल जयकर पवार, जि.जि.म.वि.प्र. सहकारी समाजाचे सचिव निलेश रणजित भोंडे तसेच जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक अनिल तुकाराम पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शिक्षणासोबतच क्रीडा, संशोधन, स्पर्धा परीक्षा, उद्योजकता आणि सामाजिक क्षेत्रातही उत्कृष्ट कामगिरी करण्याचे आवाहन केले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान हा केवळ त्यांच्या यशाचा गौरव नसून समाजातील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले. कठोर परिश्रम, सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या जोरावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही यश संपादन करता येते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हा सन्मान सोहळा जि.जि.म.वि.प्र. सहकारी समाज, जळगाव, नूतन मराठा महाविद्यालय, मराठा सेवा संघ प्रणीत मराठा उद्योजक कक्ष, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक, समाजबांधव तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound