Home Uncategorized निंभोरा ग्रामपंचायतीतील अनियमिततेवर ग्रामस्थ संतप्त; चाव्या बीडीओंकडे देण्याचा इशारा

निंभोरा ग्रामपंचायतीतील अनियमिततेवर ग्रामस्थ संतप्त; चाव्या बीडीओंकडे देण्याचा इशारा


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  तालुक्यातील निंभोरा येथील ग्रामपंचायतीच्या कामकाजातील कथित अनियमिततेविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या आठ वर्षांपासून ग्रामपंचायतीला पूर्णवेळ अधिकारी नसणे, प्रभारी अधिकाऱ्यांची वारंवार गैरहजेरी आणि विविध कामांतील अनियमितता यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या चाव्या थेट पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात जमा करण्याचा इशारा दिला आहे. निंभोरा गाव सेवा नियंत्रण समिती व ग्रामस्थांनी याबाबत लेखी निवेदन देत तात्काळ चौकशीची मागणी केली आहे.

निंभोरा ही तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असूनही येथे गेल्या आठ वर्षांपासून पूर्णवेळ ग्रामपंचायत अधिकारी उपलब्ध नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. सध्या कोचूर येथील राहुल लोखंडे यांची प्रभारी ग्रामपंचायत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र आठवड्यातील मंगळवार आणि गुरुवार हे दोन दिवस ग्रामपंचायतीत उपस्थित राहण्याचे निश्चित असतानाही ते वारंवार गैरहजर राहत असल्याने पंचायत प्रशासनाच्या कामकाजावर परिणाम होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

गुरुवार, ५ एप्रिल रोजी संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीत जाऊन प्रभारी अधिकारी का आलेले नाहीत याबाबत कर्मचाऱ्यांना जाब विचारला. ग्रामपंचायतीत जबाबदार अधिकारी नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी दोन तास प्रतीक्षा केली. मात्र अधिकारी न आल्याने पंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या हस्ते ग्रामपंचायतीला कुलूप लावण्यात आले. त्यानंतर ग्रामस्थांनी कर्मचाऱ्यांना सोबत घेत रावेर पंचायत समिती कार्यालय गाठले आणि गटविकास अधिकाऱ्यांकडे ग्रामपंचायतीच्या वर्षभरातील कामांची चौकशी करण्याची मागणी केली.

निंभोरा गाव सेवा समितीचे प्रमुख संयोजक व माजी उपसरपंच विवेक ठाकरे, प्रशांत काठोके, कैलास राजाराम चौधरी, दीपक मोरे, मुज्जफर पटेल, निलेश लोखंडे, तौकीर शेख, अब्दुल नबी मन्यार आदी ग्रामस्थांनी पंचायत समितीकडे लेखी निवेदन देत गेल्या वर्षभरात ग्रामपंचायतीने पंधरावा वित्त आयोग, ग्रामनिधी तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांतून करण्यात आलेल्या कामांची त्रयस्थ समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत सुरू असलेल्या किंवा पूर्ण झालेल्या कोणत्याही कामाचे बिल अदा करू नये, अशीही मागणी करण्यात आली आहे.

ग्रामस्थांनी निवेदनात अनेक गंभीर तक्रारी मांडल्या आहेत. ग्रामपंचायतीने बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचा आरोप करण्यात आला आहे. गावातील घरोघरी वाटपासाठी खरेदी करण्यात आलेले डस्टबीन निकृष्ट दर्जाचे असल्याचे ग्रामसभेत ठराव करूनही त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. तसेच घनकचरा व्यवस्थापनाचे काम इस्टीमेटप्रमाणे न होता बेकायदा ठेकेदाराकडून केल्याची तक्रार करण्यात आली आहे.

याशिवाय स्टेशन भागात शोषखड्डे व भराव टाकण्याच्या कामात सुमारे १२ लाख रुपयांची अनियमितता झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्राम सचिवालयासाठी सुमारे ३५ लाख रुपये खर्च करूनही अत्यंत सुमार दर्जाचे काम करण्यात आले असल्याची तक्रार आहे. तसेच गावात बसवलेली आर.ओ. पाणी शुद्धीकरण प्रणालीही कार्यान्वित नसल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले आहे.

दरम्यान, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनोद मेढे यांनी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाची भेट घेत त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. त्यांनी या सर्व प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्याचे आश्वासन दिले. मात्र पंधरा दिवसांत चौकशी सुरू झाली नाही तर २० मार्च रोजी ग्रामपंचायतीसमोर ठिय्या आंदोलन करून ग्रामपंचायतीला टाळे लावण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.


Protected Content

Play sound