Home Cities यावल खाजगी तोलकाट्यावर शेतमालाची कमी मोजणी; सांगवीत शेतकऱ्यांचा संताप उसळला

खाजगी तोलकाट्यावर शेतमालाची कमी मोजणी; सांगवीत शेतकऱ्यांचा संताप उसळला


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  तालुक्यातील सांगवी गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या खाजगी तोलकाट्यावर शेतमालाच्या वजनात तफावत करून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, यामुळे परिसरातील शेतकरी संतप्त झाले आहेत. या प्रकरणी संबंधित व्यापाऱ्याविरोधात कृषी उत्पन्न बाजार समिती, तहसील कार्यालय आणि पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा इशारा शेतकरी बांधवांनी दिला आहे.

तालुक्यातील सांगवी गावालगत असलेल्या बुऱ्हाणपूर–अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर शेतमालाचे वजन करण्यासाठी प्रमोद कपले यांचा खाजगी तोलकाटा आहे. या तोलकाट्यावर गेल्या काही दिवसांपासून वजनात मोठी तफावत होत असल्याची तक्रार अनेक शेतकऱ्यांकडून केली जात होती. शेतकऱ्यांचा आरोप आहे की, त्यांच्या शेतमालाचे वजन कमी दाखवले जात असल्यामुळे त्यांना आर्थिक फटका बसत आहे.

या प्रकाराविरोधात आज मोठ्या संख्येने शेतकरी पिक संरक्षण सोसायटी कार्यालयात जमा झाले आणि संबंधित तोलकाटा चालकास जाब विचारण्यासाठी बोलावण्यात आले. मात्र, समाधानकारक उत्तर न देता त्यांनी उडवाउडवीची भूमिका घेतल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. यामुळे शेतकऱ्यांचा रोष आणखी वाढला असून, त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे.

शेतकऱ्यांनी याबाबत उज्जैनसिंग राजपूत, कृषी उत्पन्न बाजार समिती यावलचे सभापती, तसेच मोहनमाला नाझिरकर, तहसीलदार आणि पोलिस प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतमालाच्या मोजणीत फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

दरम्यान, या संदर्भात संबंधित तोलकाटा मालक प्रमोद कपले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, हा तोलकाटा पूर्णपणे खाजगी असून सार्वजनिक वापरासाठी नाही. काही शेतकऱ्यांच्या विनंतीवरून त्यांच्या मालाचे वजन करण्यात येत होते. तांत्रिक बिघाडामुळे वजनात तफावत झाली असण्याची शक्यता असून, सध्या तोलकाटा बंद करण्यात आला आहे. संपूर्ण चौकशी पूर्ण होईपर्यंत तोलकाटा सुरू केला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या घटनेमुळे सांगवी व परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, शेतमाल विक्री प्रक्रियेत पारदर्शकता आणि विश्वासार्हता राखण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. प्रशासनाने तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound