Home Cities जळगाव घोडेगाव ग्रामपंचायत घोटाळ्याची चौकशी होणार ; आश्वासनानंतर उपोषण मागे

घोडेगाव ग्रामपंचायत घोटाळ्याची चौकशी होणार ; आश्वासनानंतर उपोषण मागे

0
109


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील घोडेगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या अंतर्गत झालेल्या कथित घोटाळ्यांच्या विरोधात जिल्हा परिषदेसमोर सुरू असलेले आमरण उपोषण अखेर प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आले आहे. ६ मार्च रोजी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याने उपोषणकर्त्यांनी आपले आंदोलन स्थगित केले आहे.

घोडेगाव खराडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या कारभारात मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि घोटाळे झाल्याचा आरोप विद्यमान सदस्य अजितकुमार भीमराव महाले आणि आबा छबुलाल जाणे यांनी केला होता. या प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी या दोन्ही सदस्यांनी गेल्या दोन दिवसांपासून जळगाव जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. बुधवारी, २५ फेब्रुवारी रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली. भ्रष्टाचार आणि प्रशासकीय त्रुटींच्या तक्रारींची गंभीर दखल घेत, त्यांनी या प्रकरणाची पारदर्शक चौकशी करण्याचे आश्वासन दिले.

६ मार्चला चौकशीचे आदेश :
या चर्चेनंतर, उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तातडीने गटविकास अधिकारी, पंचायत समिती चाळीसगाव यांना लेखी पत्र दिले आहे. या पत्रानुसार, येत्या ६ मार्च २०२६ रोजी घोडेगाव खराडी ग्रामपंचायतीच्या सर्व तक्रारींची प्रत्यक्ष चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशी अहवालात दोषी आढळणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.

आश्वासनानंतर उपोषणाची सांगता :
प्रशासनाचे लेखी पत्र आणि चौकशीचे ठोस आश्वासन मिळाल्याने, अजित कुमार महाले आणि आबा जाणे यांनी आपले उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. यावेळी भाऊसाहेब अकलाडे यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना लिंबू सरबत देऊन उपोषणाची अधिकृत सांगता करण्यात आली. ६ मार्च रोजी होणाऱ्या या चौकशीकडे आता संपूर्ण चाळीसगाव तालुक्याचे लक्ष लागून आहे.


Protected Content

Play sound