Home आंतरराष्ट्रीय भारत-पाक सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये मोठ्या बदलाची शक्यता 

भारत-पाक सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये मोठ्या बदलाची शक्यता 


कोलंबो-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील भारत-पाकिस्तान महामुकाबल्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असून आज 15 फेब्रुवारी रोजी भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियम येथे दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत. छोट्या फॉरमॅटमध्ये पाकिस्तानविरुद्ध भारताचा दमदार विक्रम राहिला असला तरी या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

माजी भारतीय सलामीवीर आणि समालोचक आकाश चोप्रा यांनी सोशल मीडियावर भारताच्या संभाव्य अंतिम अकराबाबत आपले मत व्यक्त केले आहे. त्यांच्या मते, कोलंबोची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना पोषक ठरू शकते. अलीकडील सामन्यांमध्ये स्पिनर्सना चांगली मदत मिळाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला विश्रांती देत कुलदीप यादवला संघात स्थान दिले जाऊ शकते, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी अभिषेक शर्माच्या पुनरागमनाचे संकेत दिल्याने संजू सॅमसनला अंतिम अकराबाहेर बसावे लागू शकते. याशिवाय तिसरा बदल म्हणून वॉशिंग्टन सुंदरला संधी देत रिंकू सिंगला विश्रांती देण्याची शक्यता चोप्रांनी व्यक्त केली आहे. सुंदर फिरकी गोलंदाजीसोबत संयमी फलंदाजीचा पर्याय देतो, जे कोलंबोच्या खेळपट्टीवर संघासाठी फायदेशीर ठरू शकते.

भारताची संभाव्य प्लेइंग-11 अशी असू शकते : अभिषेक शर्मा, ईशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह. या संघरचनेत तीन प्रमुख बदल दिसून येत असून रणनीतीत स्पिन आक्रमणाला अधिक प्राधान्य देण्यात आले आहे.

टी-20 विश्वचषक 2026 साठी भारतीय संघात सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, इशान किशन, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि रिंकू सिंग यांचा समावेश आहे. या दमदार संघरचनेमुळे भारताचा आत्मविश्वास उंचावलेला आहे.

दरम्यान, कोलंबोतील हवामान सध्या ढगाळ असले तरी तात्काळ पावसाची शक्यता कमी असल्याचे दिसत आहे. मात्र हवामान खात्याच्या अंदाजानुसार सामन्यादरम्यान पावसाची शक्यता पूर्णतः नाकारता येत नाही. त्यामुळे खेळपट्टीचे स्वरूप आणि हवामानाचा परिणाम या महामुकाबल्यावर कितपत होतो, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound