Home क्राईम गाडी पार्कींगवरून वृध्दाला दांडक्याने बेदम मारहाण ; चौघांवर गुन्हा दाखल

गाडी पार्कींगवरून वृध्दाला दांडक्याने बेदम मारहाण ; चौघांवर गुन्हा दाखल


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहरातील अल्फा शाळेजवळ असलेल्या परिसरात दुचाकी पार्किंगच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात एका ६५ वर्षीय वृध्दाला शेजारी राहणाऱ्या चौघांनी मिळून बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रहीम शहा हबीब शहा (वय ६५, रा. अल्फा शाळेजवळ, मुक्ताईनगर) हे आपल्या घरासमोर असताना, त्यांनी शेजारी राहणारा एजाज शेख याला आपली मोटरसायकल रस्त्याच्या बाजूला लावण्यास सांगितले. याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपीने रहीम यांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. भांडणाचा आवाज ऐकून आरोपीचे इतर तीन कुटुंबीयदेखील घरातून बाहेर आले. त्यानंतर या चौघांनी मिळून रहीम शहा यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच लाकडी दांडक्याने रहीम शहा यांच्या बरगडीवर जोरदार मारहाण केल्याने ते जखमी झाले आहे. ही घटना १९ जानेवारी रोजी संध्याकाळी ७:३० वाजेच्या सुमारास सार्वजनिक ठिकाणी घडली. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून मुक्ताईनगर पोलिसांनी एजाज शेख, फय्याज शेख, जव्वाद शेख आणि अन्य एका विरुद्ध मुक्ताईनगर पोलीसात गुन्हा दाखल केला आहे.


Protected Content

Play sound