Home Cities जळगाव दुर्गंधी व आरोग्य धोक्यावर उपमहापौर आक्रमक; बायो मायनिंगला वेग देण्याचे आदेश

दुर्गंधी व आरोग्य धोक्यावर उपमहापौर आक्रमक; बायो मायनिंगला वेग देण्याचे आदेश

0
115

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । निमखेडी शिवारातील कचरा फॅक्टरीमुळे पसरणाऱ्या दुर्गंधीचा प्रश्न आता गंभीर झाला असून, उपमहापौर मनोज चौधरी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाला कडक निर्देश दिले आहेत. गेल्या १३ वर्षांपासून साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, लहान मुलांमध्ये दमा आणि वृद्धांमध्ये श्वसनाचे विकार वाढत असल्याचे समोर आले आहे.

आज झालेल्या पाहणीत असे दिसून आले की, शहरातून दररोज सुमारे ३५० टन कचरा डेपोवर येतो, मात्र प्रत्यक्षात केवळ १०० टन कचऱ्यावरच प्रक्रिया केली जाते. उर्वरित २५० टन कचरा तसाच पडून राहत असल्याने २ ते अडीच किलोमीटर परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत आहे. महापालिका उपायुक्त निर्मला गायकवाड आणि शहर अभियंता योगेश बोरोले यांच्या उपस्थितीत झालेल्या या दौऱ्यात बायो मायनिंगच्या संथ गतीबद्दल उपमहापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

बायो मायनिंगचे काम तातडीने मार्गी लावण्यासाठी उपमहापौरांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावर, पुढील २० दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करून परिस्थिती नियंत्रणात आणली जाईल, असे आश्वासन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिले आहे. धुराचे लोट आणि दुर्गंधी थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. विशिष्ट कालावधीत हे काम पूर्ण झाल्यास परिसरातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.


Protected Content

Play sound