Home राजकीय मनसेला मोठा धक्का? राज ठाकरेंच्या अत्यंत जवळच्या नेत्याच्या राजीनाम्याची चर्चा ?

मनसेला मोठा धक्का? राज ठाकरेंच्या अत्यंत जवळच्या नेत्याच्या राजीनाम्याची चर्चा ?


मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडवणारी बातमी समोर येत असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे मानले जाणारे बडे नेते पक्षाला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

सध्या राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून महाराष्ट्रातील एकूण 29 महापालिकांसाठी निवडणुका होणार आहेत. मात्र सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे ते मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे. मुंबई महापालिकेची निवडणूक ही सर्वच प्रमुख पक्षांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. यंदा या निवडणुकीत पहिल्यांदाच नवा राजकीय प्रयोग पाहायला मिळत असून, मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांची युती झाली आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे तब्बल वीस वर्षांनंतर एकत्र आल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. या युतीत मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटानेही सहभाग घेतला आहे. त्यामुळे यंदा मुंबई महापालिकेत शिवसेना ठाकरे गट-मनसे-राष्ट्रवादी शरद पवार गट युती विरुद्ध भाजप-शिवसेना महायुती अशी थेट लढत होणार आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युतीही निवडणूक रिंगणात उतरली असल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे.

या पार्श्वभूमीवर मनसेला एकामागून एक धक्के बसत असल्याचे चित्र दिसत आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे मनसेचे जिल्हाप्रमुख सुमित खांबेकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. हा धक्का ताजा असतानाच आता मनसेला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मनसेचे नेते संदीप देशपांडे हे लवकरच राजीनामा देणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. संदीप देशपांडे हे राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जात असल्याने, त्यांनी पक्ष सोडल्यास तो मनसेसाठी मोठा धक्का ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महापालिका निवडणूक पार पडल्यानंतर संदीप देशपांडे मनसेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, जागावाटपाच्या प्रक्रियेत विश्वासात न घेतल्यामुळे संदीप देशपांडे नाराज असल्याची चर्चा आहे. या नाराजीमुळेच त्यांनी राजीनाम्याचा विचार केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, राज ठाकरे स्वतः संदीप देशपांडे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असल्याचीही माहिती समोर येत आहे.


Protected Content

Play sound