आ. राजूमामा भोळे यांचा ‘सोशल कनेक्ट’ महायुतीला ठरणार लाभदायक !


जळगाव-रामसिंग परदेशी । महापालिका निवडणुकीचा प्रचार ऐन भरात आला असतांनाच महायुतीच्या प्रचाराची सूत्रे ही आ. राजूमामा भोळे यांच्याकडे असल्याचे स्पष्टपणे अधोरेखीत झाले आहे. आमदारकीच्या तिसऱ्या टर्ममध्ये असणाऱ्या राजूमामा भोळे यांची सर्वसामान्यांशी जुडलेली नाळ ही प्रचारात निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय जाणकरांचे मत आहे.

महापालिका निवडणुकीच्या आधी महायुतीतील सर्व घटकपक्षांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता. यात विशेष करून भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असल्याने नेत्यांची अडचण झाली होती. यातच अनेक इच्छुकांनी प्रत्यक्ष आणि समाजमाध्यमांमधून आपला संताप व्यक्त केला होता. तथापि, आमदार राजूमामा भोळे यांनी अतिशय संयमीपणाने ही स्थिती हाताळली. जळगाव महापालिकेचे प्रभारी आ. मंगेश चव्हाण यांच्या सोबत व्यवस्थित ट्युनींग करून त्यांनी नाराजांच्या वेदनांवर फुंकर मारली.

यामुळे अल्प अपवाद वगळता भाजपमधील बंडखोरांची समजूत घालण्यात आमदार भोळे हे यशस्वी ठरले. येथेच त्यांच्या नेतृत्वाची पहिली चुणूक दिसली. यासोबत त्यांनी भाजपचे नेते मंत्री गिरीशभाऊ महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर व संजय पवार आणि भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासोबत व्यवस्थित नियोजन करून महायुतीच्या तब्बल बारा जागा बिनविरोध निवडून आणण्यात देखील मोलाचा वाटा उचलला.

यासोबत, प्रचाराची धामधुम सुरू होण्याआधीच भाजपच नव्हे तर महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांसोबत त्यांनी व्यवस्थितपणे जुळवून घेतल्याने महायुतीत ही एकसंघपणे निवडणुकीला सामोरे जात असल्याचे चित्र उभे राहिले. एकीकडे विरोधकांमध्ये एकजूट दिसत नसली तरी महायुतीचा मजबूतपणे निवडणूक लढवत असल्याचा सकारात्मक संदेश आधीच जळगाव शहरात गेला. आणि याचेच प्रतिबिंब प्रचारात उमटतांना दिसून येत आहे.

आता प्रचार शिखरावर पोहचला असून प्रत्येक पक्ष आणि उमेदवार हे मतदारांचा कौल मागतांना दिसत आहेत. यात आमदार राजूमामा भोळे हे केवळ भाजपच नव्हे तर महायुतीतील सर्व घटक पक्षांच्या उमेदवारांसाठी जळगाव शहर पिंजून काढत असल्याचे दिसत आहेत. आमदार भोळे यांचे समाजाच्या सर्व स्तरांमधील नागरिकांशी अतिशय आत्मीयतेचे संबंध आहेत.

तिसऱ्यांदा आमदार बनल्यानंतरही मामांमधील सच्चा समाजसेवक आणि कार्यकर्ता अद्यापही जीवंत असल्याची बाब देखील जळगावकर अनुभवत आहेतच. यामुळे विविध उमेदवारांच्या प्रचारात त्यांनी स्वत:ला झोकून दिले असून ठिकठिकाणी त्यांचे अभूतपुर्व स्वागत होत आहे. निवडणूक ही महापालिकेची असली तरी याची धुरा मामांकडे असल्याचा सरळ लाभ यातून महायुतीच्या उमेदवारांना होणार आहे.

कुठेही वादात न अडकता आमदार राजूमामा भोळे हे महापालिकेच्या रणांगणात निव्वळ सेनापती न राहता थेट रणांगणात उतरल्याची बाब ही त्यांच्या नेतृत्व कौशल्यासोबत सर्वसामान्यांशी जुडून राहण्याच्या स्वभावातून आल्याचे यातून नव्याने सिध्द झाले आहे. त्यांच्या झंझावाती प्रचार फेऱ्यांना मिळणारा प्रतिसाद आणि जनतेने त्यांचे केलेले स्वागत हे याचेच प्रतिक मानावे लागणार आहे.

तूर्तास, आमदार राजूमामा भोळे हे महायुतीचे खरे-खुरे स्टार प्रचारक असून जनता त्यांना पाहून महायुतीला भरभक्कम कौल देणार का ? याचे उत्तर निकालातच समजणार आहे. तथापि, प्रचार फेऱ्यांना लाभलेला प्रतिसाद हा महायुतीला निश्चीतच लाभदायक ठरणारा आहे.