Home राजकीय लातूरात रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावर अमित, रितेश अन् धीरज देशमुखांचा तीव्र पलटवार

लातूरात रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावर अमित, रितेश अन् धीरज देशमुखांचा तीव्र पलटवार


मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना प्रचारसभांमधील भाषणांनी राजकीय वातावरण अधिकच तापू लागले आहे. लातूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला असून, काँग्रेससह देशमुख कुटुंबीयांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी रवींद्र चव्हाण लातूर दौऱ्यावर आले असताना त्यांनी दिवंगत काँग्रेस नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव घेत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या विधानानंतर काँग्रेस नेत्यांनी संताप व्यक्त करत भाजपवर जोरदार टीका सुरू केली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणावर दिवंगत विलासराव देशमुख यांच्या तिन्ही मुलांनी उघडपणे प्रतिक्रिया देत चव्हाणांना प्रत्युत्तर दिले आहे.

आमदार अमित देशमुख यांनी या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. ते म्हणाले की, भाजप नेत्यांनी केलेली टीका लातूरची आणि महाराष्ट्राची संस्कृती नाही. लातूर आणि राज्याच्या राजकारणाला अशा पातळीवर नेण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणुकीच्या काळात लोकांना धमकावणे, पैशांचे आमिष दाखवणे, उमेदवार पळवणे, हिंसाचार आणि अपहरणासारख्या घटना घडत असल्याचा गंभीर आरोप करत, महाराष्ट्राच्या राजकारणाची अशी ओळख कधीच नव्हती, असा सवाल अमित देशमुख यांनी उपस्थित केला.

या राजकीय वादात अभिनेता रितेश देशमुख यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट भूमिका घेतली. रितेश यांनी एक व्हिडिओ शेअर करत मोजक्या पण सणसणीत शब्दांत प्रतिक्रिया दिली. “दोन्ही हात वर करून सांगतो, लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात. लिहिलेलं पुसता येतं, पण कोरलेलं नाही. जय महाराष्ट्र,” असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून काँग्रेस कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिकांनीही त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

धीरज देशमुख यांनीही सोशल मीडियावरून प्रतिक्रिया देत वडिलांच्या आठवणी अजूनही जनतेच्या मनात जिवंत असल्याचा संदेश दिला. “साहेब, तुम्ही आहात… इथेच आहात… आमच्यातच आहात… सदैव आहात,” असे शब्द लिहित त्यांनी वडिलांच्या फोटोसोबत एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे. या पोस्टमुळे समर्थकांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले आहे.

या वादावर काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनीही भाजपवर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, विलासराव देशमुख साहेबांच्या आठवणी लातूर जिल्ह्यातून पुसण्याची ताकद अद्याप कोणातही नाही. लातूरच्या विकासासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या नेत्याचा अपमान लातूरकर कधीही सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

वाद वाढत असतानाच अखेर रवींद्र चव्हाण यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत दिलगिरी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, आपण विलासराव देशमुख यांच्यावर कोणतीही वैयक्तिक टीका केलेली नाही. विलासराव हे मोठे नेते होते आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, आपल्या वक्तव्यामुळे त्यांच्या चिरंजीवांच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल आपण दिलगिरी व्यक्त करतो, असे म्हणत या विषयाकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहू नये, अशी विनंतीही त्यांनी केली.


Protected Content

Play sound