भाजपमध्ये प्रवेश करताच संतोष धुरींचे मनसेच्या नेतृत्वावर गंभीर आरोप


मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण अधिकच तापू लागले असताना मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच मोठा राजकीय स्फोट केला आहे. गळ्यात भाजपचा गमछा घालत पहिल्याच पत्रकार परिषदेत त्यांनी थेट राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करत मनसेच्या नेतृत्वावर सवाल उपस्थित केले आहेत.

संतोष धुरी यांनी म्हटले की, राज ठाकरे यांनी हिरवं रक्त असलेल्या लोकांशी युती केली असून या लोकांनी आता मनसेचा पूर्णपणे ताबा घेतला आहे. राज ठाकरे यांनी आमचा पक्ष त्यांच्या समोर पूर्णपणे सरेंडर केला आहे, असा आरोप करत त्यांनी ठाकरे बंधूंवर टीकेची झोड उठवली. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

मुंबईत मनसेला सुमारे 52 जागा सोडल्याचे सांगितले जात असले तरी त्यातील केवळ सात-आठ जागा निवडून येतील की नाही याचीही खात्री नाही, असा दावा धुरी यांनी केला. उद्धव ठाकरे गटाने मनसेला अपेक्षित जागा दिल्या नाहीत, उलट ज्या जागांवर ठाकरे गटाकडे उमेदवार नव्हते किंवा जिथे त्यांच्या विद्यमान नगरसेवकांची प्रतिमा खराब झाली होती, अशाच जागा मनसेच्या वाट्याला टाकण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

माहीम, दादर, वरळी, शिवडी आणि भांडूप यांसारख्या मराठी माणसांचा टक्का अधिक असलेल्या भागांमध्ये मनसेची केवळ एका जागेवर बोळवण करण्यात आली, असेही धुरी म्हणाले. ठाकरे गटाने त्यांना ज्या जागा सोडायच्या होत्या, त्याच मनसेला देण्यात आल्या, त्यामुळे मनसेला मुद्दाम दुय्यम वागणूक दिल्याचा आरोप त्यांनी केला.

मुंबईत ठाकरे गट आणि मनसे यांच्यात जागावाटपाची चर्चा सुरू असताना प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मनसेला दोन जागा देण्याचे ठरले होते, असा दावाही संतोष धुरी यांनी केला. मात्र, दादरमधील वॉर्ड क्रमांक 190 आणि 192 या जागा मिळणार नसल्याची माहिती नितीन सरदेसाईंनी दिल्यानंतर आपण नाराजी व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले. अखेर वॉर्ड क्रमांक 192 ठाकरे गटाकडे गेला आणि तो वॉर्डही प्रकाश पाटणकर यांच्याकडून काढून घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

मला जागावाटपाच्या चर्चेत सामील करून घेतले नाही किंवा उमेदवारी दिली नाही याचा राग नाही, कारण राज साहेबांनी आम्हाला आधीच खूप काही दिले आहे, असे सांगत धुरी यांनी मात्र पक्षातील अंतर्गत निर्णयप्रक्रियेवर बोट ठेवले. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनाही जागावाटपाच्या चर्चेत कुठेच सामावून घेतले गेले नाही, असा आरोप त्यांनी केला.

या संदर्भात विचारणा केल्यानंतर वरूनच निर्णय झाल्याचे सांगण्यात आले आणि राज ठाकरे यांनी संतोष धुरी व संदीप देशपांडे हे दोन “किल्ले” सरेंडर केल्याचा आदेश वांद्र्याच्या बंगल्यावरून आला, असा खळबळजनक दावा धुरी यांनी केला. हे दोघे उमेदवार म्हणून किंवा जागावाटपात कुठेही दिसणार नाहीत, असा स्पष्ट आदेश असल्याचेही त्यांनी सांगितले.

भाजपमध्ये प्रवेश करताच केलेल्या या वक्तव्यांमुळे मनसे, ठाकरे गट आणि एकूणच मुंबईच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, आगामी महापालिका निवडणुकीआधी ठाकरे विरुद्ध भाजप हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.