भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये १६ डिसेंबर रोजी घडलेल्या हृदयद्रावक दुर्घटनेचे पडसाद आज संपूर्ण शहरात उमटले. नर्सरीमध्ये शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांचा नाल्याच्या पाण्यात बुडून झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ आज, शनिवारी (२० डिसेंबर) भडगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापारी आणि नागरिकांनी कोणत्याही दबावाशिवाय स्वयंस्फूर्तीने आपले व्यवहार बंद ठेवून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला.
शहरातील मुख्य बाजारपेठ, बसस्थानक परिसर, बडेसर कॉम्प्लेक्स, नवकार प्लाझा, चाळीसगाव रोड आणि पाचोरा रोडसह पेठभागातील सर्व दुकानदारांनी सकाळी नऊ वाजेपासूनच आपले शटर खाली ठेवले होते. रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला असून, चिमुकल्यांना न्याय मिळावा हीच भावना प्रत्येक नागरिकाच्या मनात दिसून आली.

या घटनेला चार दिवस उलटूनही प्रकरणातील ८ ते १० आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. या संदर्भात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. “दोषींना तात्काळ अटक करावी, शाळेचे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करून तिथे प्रशासकाची नेमणूक करावी,” या प्रमुख मागण्यांचे निवेदन आज दुपारी तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना दिले जाणार आहे.
शाळा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दोन निरागस बालकांचा बळी गेल्याने संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट आहे. जोपर्यंत दोषींना अटक होत नाही आणि पीडित कुटुंबांना योग्य न्याय मिळत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही, असा इशारा स्थानिक नेत्यांनी दिला आहे. या बंदमुळे भडगावात १०० टक्के प्रतिसाद मिळाला असून, पोलीस प्रशासनाकडून शहरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.



