रखडलेल्या दोन प्रभागांसाठी भुसावळकर बजावताहेत मतदानाचा हक्क !

0
142

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या भुसावळ नगरपरिषदेच्या रखडलेल्या दोन प्रभागांसाठी शनिवारी २० डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजेपासून मतदान प्रक्रियेला उत्साहात सुरुवात झाली आहे. प्रभाग क्रमांक ४ ‘ब’ आणि ११ ‘ब’ मधील मतदार आपला कौल कोणाच्या बाजूने देतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

भुसावळमधील एकूण तीन प्रभागांच्या निवडणुका न्यायालयीन अपीलामुळे लांबणीवर पडल्या होत्या. त्यापैकी एका प्रभागातील उमेदवाराची आधीच बिनविरोध निवड झाली आहे. परिणामी, उर्वरित दोन जागांसाठी आज मतदान प्रक्रिया राबवण्यात येत आहे. गेल्या १८ दिवसांपासून या निवडणुका रखडल्या होत्या, त्यामुळे या दोन प्रभागातील उमेदवारांसाठी ही निवडणूक अटीतटीची ठरत आहे.

आज सायंकाळपर्यंत मतदान पार पडल्यानंतर, रविवारी २१ डिसेंबर नगरपरिषदेचा संपूर्ण अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे. भुसावळ शहराचा पुढील विकास आणि सत्तेचे समीकरण या दोन प्रभागांच्या निकालावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असणार आहे. मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांनी रांगा लावल्या असून, अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उद्या होणाऱ्या मतमोजणीनंतर भुसावळ नगरपरिषदेवर कोणाचा झेंडा फडकणार, याचा फैसला होईल.