सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचा दोन दिवसीय आढावा दौरा यशस्वीरीत्या पूर्ण झाला असून, या दौऱ्यात पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि आत्मविश्वासाचे वातावरण दिसून आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मार्गदर्शनाखाली २६ आणि २७ ऑक्टोबर २०२५ रोजी हा दौरा पार पडला. रावेर, चोपडा, भुसावळ, जामनेर आणि मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघांचा यात समावेश होता.
या दौऱ्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अरिझ बेग मिर्झा, महासचिव डॉ. अरविंद कोलते, तसेच निरीक्षक श्याम उमरकर आणि तुलशीराम नाईक यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनतेशी संवाद साधत जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांबाबत सविस्तर चर्चा केली. प्रत्येक ठिकाणी निरीक्षकांचे जोरदार स्वागत झाले आणि कार्यकर्त्यांनी निवडणुका लढविण्याची तयारी व संघटनात्मक ताकद दाखवून दिली.

निरीक्षकांनी घेतलेल्या संवादातून स्पष्ट झाले की, अनेक वर्षांपासून काही विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसला प्रतिनिधित्व नसले तरी पक्षाची धर्मनिरपेक्ष व उदारमतवादी विचारसरणी आजही जनमानसात जिवंत आहे. २०२४ च्या निवडणुकांमध्ये मतदारांच्या मनोवृत्तीत झालेला बदल हे याचेच प्रत्यंतर असल्याचे निरीक्षकांनी नमूद केले.
सध्याच्या राजकीय परिस्थितीत काँग्रेसला नवी संधी मिळू शकते, असेही निरीक्षकांनी सांगितले. सत्ताधारी भाजप-युती सरकारच्या ‘लाडकी बहिण योजना’तील कठोर KYC अटी, खतांच्या वाढलेल्या किंमती आणि शेतमालाला अपुरे दर मिळाल्यामुळे शेतकरी नाराज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. हे सर्व घटक आगामी निवडणुकांत निर्णायक भूमिका बजावू शकतात.
दरम्यान, भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युतीपासून स्वतंत्र लढविण्याचा घेतलेला निर्णय हे राजकीय समीकरणात महत्त्वाचे वळण ठरले आहे. या पार्श्वभूमीवर निरीक्षकांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन केले की, पक्षाने या परिस्थितीचा योग्य उपयोग करून महाविकास आघाडीचा “वज्रमूठ” जिल्ह्यात अधिक मजबूत करावा. तसेच, प्रत्येक मतदारसंघातील स्थानिक नेत्यांना त्यांच्या प्रभारींच्या सल्ल्यानुसार स्वतंत्र किंवा आघाडीतून लढण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. एकूणच, रावेर लोकसभा मतदारसंघातील हा आढावा दौरा यशस्वी ठरला असून, काँग्रेस पक्षाच्या ताकदी, अडचणी आणि संधींचे वास्तव चित्र स्पष्ट झाले आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी निर्माण झाली असून, आगामी निवडणुकांसाठी पक्ष सज्ज असल्याचे या दौऱ्यातून अधोरेखित झाले.



